Infosys-TCS Freshers Package : तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कुणी कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर असेल आणि फ्रेशर म्हणून नोकरीच्या शोधात असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. देशातील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी Infosys फ्रेशर्सना 9 लाख रुपये, तर TCS 11 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज ऑफर करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इन्फोसिसने कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हअंतर्गत एक नवीन 'पॉवर प्रोग्राम' सुरू केला आहे. यामध्ये फ्रेशर्सना वार्षिक 9 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज दिले जाईल. हे कंपनीच्या साधारणत: 3 ते 3.5 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या पॅकेजपेक्षा तीन पट जास्त आहे.
विशेष उमेदवार निवडले जाणार...
कंपनी 'पॉवर प्रोग्राम' अंतर्गत विशेष उमेदवारांची निवड करणार आहे. त्यांचे स्पेशलायझेशन कोडिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रोग्रामिंग इत्यादीमध्ये होईल. या अंतर्गत इन्फोसिस 4 ते 9 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज ऑफर करेल. उमेदवाराला काय काम दिले जाईल, हे त्याच्या स्पेशलायझेशनवर अवलंबून असेल. विशेष म्हणजे, टीसीएसच्या 'प्राइम' प्रोग्रामला टक्कर देण्यासाठी इन्फोसिसने हा नवीन प्रोग्राम लॉन्च केला आहे.
TCS तीन प्रकारचे फ्रेशर्स निवड करते
टाटा समूहाची आयटी कंपनी TCS मध्येही एखा विशेष प्रोग्राम अंतर्गत उमेदवारांची निवड केली जाते. कंपनी त्यांच्या 'प्राइम' प्रोग्राम अंतर्गत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी फ्रेशर्सना 9 ते 11 लाख रुपयांचे पॅकेज देते. या 'प्राइम' प्रोग्राममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), जनरेटिव्ह AI (GenAI) आणि मशीन लर्निंग (ML) सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा समावेश आहे. TCS आता तीन प्रकारचे फ्रेशर्स निवडत आहे. यामध्ये पहिला 'निंजा' आहे, ज्याचे पॅकेज सुमारे 3.6 लाख रुपये आहे, दुसरा 'डिजिटल' आहे, ज्याचे पॅकेज 7.5 लाख रुपये आहे, तर तिसरा 'प्राइम' आहे, ज्याचे पॅकेज 9-11 लाख रुपये आहे.
विशेष उमेदवारांना घेण्यावर भर
Infosys आणि TCS या दोन्ही कंपन्या अधिकाधिक विशेष लोकांना कामावर घेऊ इच्छिते, कारण क्लाउड कंप्युटिंग, AI/ML आणि सायबर सुरक्षा, यांसारख्या कामासाठी लोकांची गरज आधीच वाढली आहे. हे सर्व डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे होत आहे. बाजारातील बदलत्या परिस्थितीत इन्फोसिसने यावर्षी 15,000 ते 20,000 फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. तर, टीसीएसने गेल्या वर्षीप्रमाणे या वेळीही 40,000 फ्रेशर्सची भरती करण्याची योजना आखली आहे.
गेल्या वर्षी 70 हजार लोकांना नोकरीवरून काढले
देशातील टॉप 5 आयटी कंपन्यांनी गेल्या वर्षी 70,000 हून अधिक लोकांना कामावरून काढून टाकले होते. पण आता इन्फोसिस आणि टीसीएसने पुन्हा लोकांना कामावर घेण्यास सुरुवात केली आहे. TCS ने जून तिमाहीत 5,452 नवीन लोकांना नियुक्त केले आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला कंपनीने 13249 लोकांची कपात केली होती. दुसरीकडे, इन्फोसिसने या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुमारे 2000 कर्मचारी कमी केले आहेत. कंपनीत सध्या 315,332 कर्मचारी आहेत. आता इन्फोसिसने पुन्हा ऑन-कॅम्पस आणि ऑफ-कॅम्पस अशा दोन्ही फ्रेशर्सची नियुक्ती सुरू केली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजी आणि विप्रो सारख्या इतर मोठ्या आयटी कंपन्या देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत आहेत.