ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती (Akshata Murty) यांच्या संपत्तीत इन्फोसिसच्या (Infosys) शेअरहोल्डिंगमुळे मोठी वाढ झाली आहे. संडे टाइम्स रिच लिस्टनुसार, ६५.१ कोटी ग्रेट ब्रिटन पौंड संपत्तीसह हे दाम्पत्य या यादीत २४५ व्या स्थानावर पोहोचलं आहे. गेल्या सुनक दाम्पत्य या यादीत २७५ व्या स्थानावर होते. याचाच अर्थ यंदा त्यांनी ३० स्थानांची झेप घेतली आहे.
इन्फोसिसमुळे उत्पन्नात वाढ
'संडे टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, या दाम्पत्याची सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे इन्फोसिसमधील अक्षता मूर्ती यांचा हिस्सा. ही बंगळुरूस्थित आयटी कंपनी आहे, ज्याची पायाभरणी अक्षता मूर्ती यांच्या वडिलांनी म्हणजेच नारायण मूर्ती (Narayana Murthy) केली होती. ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती हे दोघेही 44 वर्षांचे आहेत. तर मूर्ती यांची कमाई त्यांचे पती ऋषी सुनक यांच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.
सुनक यांनी २०२२-२३ मध्ये २२ लाख ब्रिटिश पौंड कमावले, तर गेल्या वर्षी मूर्ती यांनी अंदाजे १.३ कोटी ब्रिटिश पौंड लाभांशाच्या रुपात कमावले. मूर्ती यांनी इतर सहा जणांसोबत मिळून १९८१ मध्ये इन्फोसिसची स्थापना केली. इन्फोसिस ही भारतातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपन्यांपैकी एक आहे आणि भारताच्या आयटी उद्योगाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
हिंदुजा घराण्याचं वर्चस्व
ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये भारतीय वंशाचं हिंदुजा कुटुंब पुन्हा एकदा अव्वल स्थानी आलं आहे. या कुटुंबाची संपत्ती ३७.१९६ अब्ज ब्रिटिश पौंड इतकी आहे. संडे टाईम्सच्या रिच लिस्टमध्ये डेव्हिड आणि सायमन रुबेन या भारतीय वंशाच्या बंधूंचाही समावेश आहे. गेल्या वर्षी चौथ्या स्थानावर असलेले हे बंधू आता तिसऱ्या स्थानावर असून त्यांची एकूण संपत्ती २४.९७७ अब्ज ब्रिटिश पौंड इतकी आहे.
लक्ष्मी मित्तल यांची संपत्ती घटली
आर्सेलर मित्तल स्टील कंपनीचे लक्ष्मी नारायण मित्तल १४.९२१ अब्ज ब्रिटिश पौंड संपत्तीसह या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते या यादीत दोन स्थानांनी घसरले आहे. वेदांता रिसोर्सेसचे उद्योगपती अनिल अग्रवाल ७ अब्ज ब्रिटिश पौंड संपत्तीसह या यादीत २३ व्या स्थानावर आहेत. २०२३ च्या तुलनेत ते एका स्थानाने खाली आले आहेत.