नवी दिल्ली – देशात दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिस(Infosys) चे सीईओ सलील पारेख यांच्या पगारात तब्बल ८८ टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या वार्षिक रिपोर्टनुसार, पारेख यांचा वार्षिक पगार ४२ कोटींवरून आता ७९ कोटींपर्यंत पोहचला आहे. त्याचसोबत सलील पारेख यांनी देशातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत नाव नोंदवले आहे. सलील पारेख (Salil Parekh) यांच्या नेतृत्वात कंपनी चांगले काम करत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्या पगारात घसघशीत वाढ केली आहे.
पगारात वाढ करून कंपनीने पारेख यांना भेट दिली आहे. २०१८ पासून ते कंपनीत काम करत आहेत. २०१८ मध्ये कंपनीची व्हॅल्यू ७० हजार ५२२ कोटी इतकी होती. जी २०२२ मध्ये १ लाख २१ हजार ६४१ कोटींपर्यंत पोहचली आहे. पारखे यांच्या कामगिरीवर खूश होऊन कंपनीने त्यांच्या पगारात ७७ ते ८६ टक्के पगारवाढ केली आहे.
या वाढीमुळे पारेख यांचा पगार देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांच्या पगारापेक्षा जास्त झाला आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये गोपीनाथन यांचा पगार सुमारे २६.६ टक्क्यांनी वाढून २५.७७ कोटी रुपये झाला. पारेख यांना IT उद्योगात ३० वर्षांचा अनुभव आहे. जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. त्यापूर्वी त्यांनी कॅपजेमिनीमध्ये २५ वर्षे काम केले होते.
मागच्या वर्षी किती पॅकेज मिळाले?
आर्थिक वर्ष २०२२ मध्ये, पारेख यांना एकूण ७१.०२ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले, जे मागील वर्षाच्या तुलनेत ४३ टक्के अधिक आहे. यादरम्यान, त्यांना मूळ वेतन म्हणून ५.६९ कोटी रुपये, सेवानिवृत्तीचे लाभ म्हणून ३८ लाख रुपये, एकूण निश्चित वेतन म्हणून ६.०७ कोटी रुपये आणि वेरिएबल वेतन म्हणून १२.६२ कोटी रुपये मिळाले. तसेच, त्यात ५२,३३ कोटी रुपयांच्या स्टॉक पर्यायांचा समावेश आहे.
अलीकडेच इन्फोसिसने पारेख यांचा कार्यकाळ आणखी पाच वर्षांनी वाढवण्याची घोषणा केली होती. पारेख यांची १ जुलै २०२२ ते ३१ मार्च २०२७ पर्यंत पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, सलील पारेख यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा एकूण भागधारक परतावा ३१४ टक्के आहे. आयटी कंपन्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, आर्थिक वर्ष २०१८ मधील नफ्यात वाढ १६०२९ कोटी रुपयांवरून २२११० कोटी रुपयांपर्यंत वाढली.