नवी दिल्ली : शेतकरी कुटुंबात जन्मलेला व्यंकटसामी विघ्नेश याला आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नोकरी मिळाली, तेव्हा त्याच्या कुटुंबाला आनंद झाला. नेहमी अभ्यासाशी जोडलेल्या विघ्नेश याला शेतीचा अनुभव नव्हता. तसेच, त्याने शेती करावी असे त्याच्या कुटुंबीयांना वाटत नव्हते.
लॉकडाऊन दरम्यान घरी आलेला विघ्नेश शेताकडे वळला आणि नंतर त्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या नोकरीला रामराम ठोकला. दोन वर्षांपूर्वी विघ्नेश याच्या निर्णयावर त्याचे कुटुंबीय खूश नव्हते. पण, कृषी क्षेत्रात करिअर करण्यासाठी जपानला गेलेला विघ्नेश आता वांग्याच्या शेतात काम करून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे खूप खूश आहे. तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील कोविलपट्टी येथे राहणारा 27 वर्षीय विघ्नेश हा जपानमध्ये वांग्याच्या शेतीत काम करत आहे.
सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करताना विघ्नेशला जेवढे पैसे मिळत होते, त्याच्या दुप्पट पैसे आता त्याला मिळतात. तो काम करत असलेल्या ठिकाणी त्याला मोफत राहण्याची सोयही मिळाली आहे. विघ्नेश सांगतो की, जपानमध्ये कमी जिरायती जमीन असल्याने अतिशय आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. जपानमध्ये प्रति एकर उत्पादनही भारतापेक्षा जास्त आहे.
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, विघ्नेश जपानमध्ये वांग्याची शेती सांभाळतो. पिकाची काळजी घ्यावी लागते, असे त्याचे म्हणणे आहे. याशिवाय, पीक तयार झाल्यावर ते कापणी, साफसफाई आणि प्रक्रिया करण्यास मदत करतो. जपानमध्ये शिकण्यासारखे खूप काही आहे. येथे बहुतांश काम मशिनद्वारे केले जाते. खूप कमी शारीरिक श्रम होतात, असे विघ्नेशचे म्हणणे आहे.
जपानी भाषा आणि संस्कृती शिकलीविघ्नेशने सांगितले की, जपानमध्ये कृषी क्षेत्रात काम करण्याआधी त्याने चेन्नईतील निहोन एज्युटेक येथून जपानी भाषा, संस्कृती आणि शिष्टाचारचे शिक्षण घेतले. निहोन एज्युटेक भारतीय उद्योग महासंघ (CII) च्या सहकार्याने काम करते. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर विघ्नेशला जपानमधील वांग्याच्या शेतात कृषी कामगार म्हणून नोकरी मिळाली.