जगभरात दबदबा असलेली भारतातील प्रमुख आयटी कंपनी इन्फोसिसला टाटा बायबाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल ८०००० कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली आहे. कर्मचारी सोडून जाण्याच्या या वेगाने टीसीएसलाही मागे टाकले आहे.
आयटी कंपन्यांमध्ये टॅलेंट असलेले कर्मचारी फोडण्याचे वॉर नेहमीच सुरु असते. अशावेळी जास्त पगार ऑफर केला जातो. पोस्टही वाढविली जाते आणि कर्मचारी इकडच्या होडीतून तिकड्च्या होडीत उड्या मारतात. इन्फोसिसने बुधवारी जानेवारी ते मार्च २०२२ तिमाहीचे निकाल घोषित केले. यामध्ये हैराण करणारी बाब समोर आली आहे.
देशातील इन्फोसिस ही टॅलेंटेड लोकांची खाण असल्याचे म्हटले जाते. जगभरात इन्फोसिसचे नाव अग्रक्रमांकावर असते. असे असले तरी हा टॅलेंट आता इन्फोसिस सोडून जावू लागल्याचे चित्र समोर आले आहे. इन्फोसिस आयकर विभागाची वेबसाईट बनवून कमालीची प्रसिद्धीच्या झोतात आली होती. आयकर विभागाची वेबसाईटला मोठ्या प्रमाणावर समस्या येत होत्या. यामुळे अनेकदा अर्थमंत्र्यांनी इन्फोसिसला झापलेही होते.
इन्फोसिसने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यांत कंपनीतून 27.7% कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. हा आकडा गेल्या १२ महिन्यांत नोकरी सोडून जाणाऱ्यांपेक्षा खूप जास्त आहे. सतत तिसऱ्या तिमाहीत २० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली आहे. तर टीसीएसने सोमवारी दिलेल्या आकड्यानुसार या तिमाहीत १७.४ टक्के कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली आहे.
ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत 25.5% कर्मचाऱ्यांनी इन्फोसिस सोडली. जुलै-सप्टेंबरमध्ये 20.1% आणि एप्रिल-जूनमध्ये 13.9% कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली. कंपनीने २०२१-२२ मध्ये एकूण 52,822 लोकांना नोकरी दिली आहे. कंपनीमध्ये मार्चपर्यंत एकूण 2,97,859 कर्मचारी होते. ८० हजारच्या बदल्यात कंपनीने २२००० नवे कर्मचारी घेतले आहेत.