infosys layoff : उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या मालकीची इन्फोसिस कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ३०० हून अधिक प्रशिक्षणार्थींना कामावरुन काढल्याने कंपनी वादात सापडली होती. याविरोधात आयटी कामगार संघटनेने आंदोलनही केलं होतं. या घटनेची दखल थेट केंद्र सरकारने घेतली होती. अशा परिस्थितीत इन्फोसिसने पुन्हा एकदा २४० प्रशिक्षणार्थींना कामावरून काढून टाकले आहे. हा निर्णय १८ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आला. हे प्रशिक्षणार्थी (नवीन कर्मचारी) कंपनीच्या अंतर्गत चाचणीत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. या तरुणांपुढे कंपनीने २ पर्याय ठेवले होते.
ट्रेनी कर्मचाऱ्यांपुढे २ पर्यायइन्फोसिसने काढून टाकलेल्या प्रशिक्षणार्थींकडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे बीपीएम (बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट) मध्ये करिअर करणे, ज्यासाठी अपग्रेड सोबत मोफत प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते इन्फोसिस बीपीएम लिमिटेडमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकतात. दुसरा पर्याय म्हणजे आयटी (माहिती तंत्रज्ञान) मध्ये कौशल्य विकास, ज्यासाठी एनआयआयटीच्या सहकार्याने एक मोफत अभ्यासक्रम आयोजित केला जाईल. यामुळे त्यांना आयटी क्षेत्रात इतर नोकऱ्या मिळण्यास मदत होईल.
कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : इन्फोसिसकामावरुन कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी इन्फोसिसने पुढाकार घेतला आहे. “जर तुम्हाला इन्फोसिसच्या बाहेर नवीन संधी शोधायच्या असतील तर आम्ही तुम्हाला व्यावसायिक आउटप्लेसमेंट सेवा देत आहोत. तसेच, आम्ही तुम्हाला आणखी एक करिअर पर्याय देऊ इच्छितो. बीपीएम उद्योगातील संभाव्य भूमिकांसाठी इन्फोसिस प्रायोजित बाह्य प्रशिक्षण. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही इन्फोसिस बीपीएम लिमिटेडमध्ये उपलब्ध असलेल्या संधींसाठी अर्ज करू शकता, असा ई-मेल कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. जर तुम्हाला तुमचे आयटी कौशल्य आणखी वाढवायचे असेल, तर इन्फोसिस प्रायोजित आयटी फंडामेंटल्स प्रशिक्षण कार्यक्रम देखील उपलब्ध आहे, जो तुम्हाला तुमच्या आयटी करिअरच्या प्रवासात आणखी पुढे घेऊन जाईल.
वाचा - तुमचेही पैसे ब्लूस्मार्ट वॉलेटमध्ये अडकलेत? रिफंडसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस फॉलो करा
आयटी उद्योगाची स्थिती काय आहे?सध्याच्या बाजार परिस्थितीमुळे इन्फोसिसला हे पाऊल उचलावे लागले आहे. अमेरिका आणि युरोपसारख्या मोठ्या बाजारपेठेतील ग्राहक त्यांचे खर्च कमी करत असल्याने सध्या आयटी क्षेत्रात कमी प्रकल्प सुरू आहेत. इन्फोसिसने या वर्षी केवळ ०-३ टक्के महसूल वाढ अपेक्षित केली आहे, जी या क्षेत्रातील मंदीचे संकेत देते. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला, ३०० हून अधिक प्रशिक्षणार्थींना काढून टाकण्यात आले होते. तर मार्चमध्ये, ३०-४५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकावे लागले.