Infosys Layoff: देशातील आघाडीची IT कंपनी Infosys ने सुमारे 400 नवीन कर्मचाऱ्यांना (फ्रेशर्स) नोकरीतून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व कर्मचाऱ्यांची भरती ऑक्टोबर 2024 मध्ये झाली होती. या सर्वांना कंपनीच्या म्हैसूर कॅम्पसमध्ये सुरुवातीचे प्रशिक्षण देण्यात आले, मात्र सलग तीन प्रयत्न करुनही ते अंतर्गत परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत.
दरम्यान, आयटी कर्मचाऱ्यांची संघटना एनआयटीईएसने सांगितले की, नोकरीवरुन काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या यापेक्षा खूप जास्त आहे. युनियनने कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, कंपनीवर त्वरित हस्तक्षेप आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नापास करण्यासाठी परीक्षा घेतल्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका फ्रेशर्सने सांगितले की, "ही कारवाई पूर्णपणे चुकीची आहे. कारण, ही परीक्षा खूप कठीण होती. आम्हाला नापास करण्यासाठीच परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षेच्या निकालानंतर अनेक फ्रेशर्सना जबर मानसिक धक्का बसला आहे." दरम्यान, या सर्व फ्रेशर्सना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कॅम्पस सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कंपनीने काय म्हटले?
मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीने सांगितले की, आमच्याकडे इन्फोसिसमध्ये एक अतिशय कठोर भरती प्रक्रिया आहे. यानुसार, सर्व नवीन कर्मचाऱ्यांना आमच्या म्हैसूर कॅम्पसमध्ये प्रशिक्षण दिल्यानंतर अंतर्गत परीक्षा घेतली जाते. सर्व नवीन कर्मचाऱ्यांना या परीक्षात यशस्वी होण्याच्या तीन संधी मिळतात. तिन्ही वेळेस अपयशी झालेल्या कर्मचाऱ्यांनाच कामावरुन काढले जाते. असे कंपनीच्या करारातही लिहिलेले असल्याचे कंपनीने सांगितले.
सरकारकडे कारवाईची मागणी
नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (NITES) ने दावा केला आहे की, नव्याने काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांची भरती ऑक्टोबर 2024 मध्ये करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना त्यांची ‘ऑफर लेटर’ मिळाल्यानंतर दोन वर्षे वाट पाहावी लागली. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन NITES कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे अधिकृत तक्रार दाखल करत आहे, ज्यामध्ये इन्फोसिस विरुद्ध त्वरित हस्तक्षेप आणि कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.