Join us

“स्वतः ८५-९० तास काम केले, ४० वर्षांच्या कारकिर्दीत...”; नारायण मूर्ती स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 4:32 PM

Infosys Narayana Murthy News: आई-वडिलांनी दिलेला एक कानमंत्र आयुष्यभर लक्षात ठेवला, असे नारायण मूर्ती यांनी सांगितले.

Infosys Narayana Murthy News: भारताला जर चीन आणि जपान या वेगाने विकास साधत असलेल्या देशांशी स्पर्धा करायची असेल तर आपली उत्पादकता वाढवावी लागेल. आठवड्यात सुमारे ७० टक्के काम करावे लागेल, असे विधान इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी केले होते. यानंतर देशभरात दोन गट पडले होते. यावरून अनेक संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. मात्र, यातच आता नारायण मूर्ती यांनी आपण स्वतः किती तास काम करायचो, याबाबत खुलासा केला आहे. 

एका मुलाखतीत बोलताना नारायण मूर्ती यांनी सांगितले की, इन्फोसिसची स्थापना करताना तासनतास कामात गुंतलेले असायचो. मी सकाळी ६.२० वाजता ऑफिसमध्ये जायचो आणि सायंकाळी उशीरा ८.३० वाजता ऑफिसमधून बाहेर पडायचो. याप्रमाणे आठवड्यातले सहा दिवस काम करत होतो. तसेच जी विकसित राष्ट्रे आपल्याला दिसत आहेत, त्यांनीही अशाच प्रकारे कठोर मेहनत घेतलेली आहे, असे नारायण मूर्ती यांनी स्पष्टपणे सांगितले. 

स्वतः ८५-९० तास काम केले, त्यामुळे मी इथे आहे

पुढे बोलताना नारायण मूर्ती यांनी सांगितले की, माझ्या आई-वडिलांनी एक गोष्ट शिकवली होती. जर गरिबीतून बाहेर पडायचे असेल तर कठोर परिश्रम करण्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. हा कानमंत्र आयुष्यभर लक्षात ठेवला. माझ्या ४० वर्षांहून अधिकच्या व्यावसायिक कारकिर्दीत आठवड्याला ७० हून अधिक तास काम केले आहे. तसेच १९९४ मध्ये तर आठवड्याचे सहा दिवस काम करताना ८५ ते ९० तास पूर्ण करायचो. ते माझे काम वाया गेले नाही. त्यामुळेच आज मी इथे आहे, असे नारायण मूर्ती यांनी नमूद केले. 

दरम्यान, यापूर्वी एका मुलाखतीत बोलताना नारायण मूर्ती म्हणाले होते की, भारताला जर चीन आणि जपान या वेगाने विकास साधत असलेल्या देशांशी स्पर्धा करायची असेल तर आपली उत्पादकता वाढवावी लागेल. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपानमधील लोक आठवड्याला अधिक तास काम करत होते. त्यामुळेच युद्धाच्या सावटातून ते लवकर बाहेर पडले. भारतीय तरुणांनी आपल्या देशासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी अशा प्रकारे परिश्रम केले पाहिजेत. यानंतर अनेकांनी नारायण मूर्ती यांच्या आठवड्याला ७० तास काम करण्याच्या विधानाचे समर्थन केले होते. तर काही जणांनी नाराजी व्यक्त केली होती. 

टॅग्स :नारायण मूर्तीइन्फोसिस