Infosys Narayana Murthy: आपल्या अथक प्रयत्नांनी इन्फोसिस कंपनीची डंका जगभर गाजवणारे संस्थापक म्हणजे नारायण मूर्ती. दिग्गज उद्योजकांपैकी एक असलेल्या नारायण मूर्ती यांचा प्रवास अतिशय प्रेरणादायी असाच आहे. यातच आता Air India मध्ये नोकरीची मोठी ऑफर असतानाही अर्धा पगार असलेल्या IIMमधील नोकरीची ऑफर का स्वीकारली, याबाबत नारायण मूर्ती यांनी सांगितले.
या दिग्गज उद्योगपतीने त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी अनेकदा उघड केल्यात. अनेक वेळा ते तरुणांना आपल्या कथेने प्रेरित करतात. एकदा त्यांनी एअर इंडियाची नोकरीची ऑफर नाकारून IIM अहमदाबाद (IIM-A) मध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता, तो का घेतला होता याचे कारण आता सांगितले आगे. अब्जाधीश उद्योगपती असलेल्या नारायण मूर्तींनी आयआयटी कानपूरमधून मास्टर्स केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना देशातील अनेक मोठ्या कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर्स आल्या. यामध्ये एअर इंडिया, टेल्को, टिस्को या कंपन्यांचा समावेश होता.
त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटले
एअर इंडिया, टेल्को, टिस्को या कंपन्यांच्या ऑफर येत होत्या. मात्र, नारायण मूर्ती यांनी आयआयएम अहमदाबादमध्ये चीफ सिस्टम प्रोग्रामर म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. मोठ्या कंपन्यांच्या ऑफरच्या तुलनेत ऑफर तशी छोटी होती. नारायण मूर्ती यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. आयआयएममधला त्यांचा पगार मोठ्या कंपन्यांच्या ऑफरच्या जवळपास निम्मा होता. IIM मधील लो-प्रोफाईल नोकरीसाठी मोठ्या कंपन्यांकडून आलेल्या नोकरीच्या ऑफर त्यांनी का नाकारल्या हे नारायण मूर्तींनी सांगितले.
आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय
आयआयएम देशात पहिल्यांदाच शेअरिंग सिस्टम बसवण्याचा विचार करीत होता. असे करणारी IIM अहमदाबाद ही जगातील तिसरी संस्था होती. त्यापूर्वी फक्त हार्वर्ड आणि स्टॅनफोर्डने ही यंत्रणा बसवली होती. या कारणामुळे नारायण मूर्ती यांनी आयआयएम अहमदाबादची ऑफर स्वीकारली होती. याबाबत बोलताना ते म्हणाले की, माझ्या १६ विद्यार्थ्यांच्या बॅचमधला एकटाच असा होतो की, जो अर्ध्या पगारावर नोकरीवर रुजू झालो होतो. माझा उद्देश केवळ आधुनिक ऑपरेटिंग सिस्टिमची माहिती घेणे हा होता. यामुळे मला गुणवंत विद्यार्थ्यांसोबत जवळून काम करण्याची संधी मिळणार होती. आम्ही विविध प्रकारचे संवादात्मक धडे तयार करणार होतो, म्हणून मी हा मार्ग निवडला. माझ्या आयुष्यातील हा कदाचित सर्वोत्तम निर्णय होता, असे नारायण मूर्ती यांनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"