Join us  

Infosys NR Narayana Murthy : भारताला चीनकडून प्रामाणिक संस्कृती शिकायला हवी, मला देशद्रोही म्हणू नका : नारायण मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 6:44 PM

Infosys NR Narayana Murthy : भारताला चीनकडून प्रामाणिकपणाची संस्कृती शिकण्याची गरज असल्याचे दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे को फाऊंडर एनआर नारायण मूर्ती यांनी केले.

“भारताला चीनकडून प्रामाणिकपणाची संस्कृती शिकण्याची गरज आहे. १९४० पर्यंत भारत आणि चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार जवळपास समान होता. पण त्यानंतर चीनचा विकास झपाट्याने झाला आणि आज त्यांची अर्थव्यवस्था भारताच्या ६ पट आहे. यामागे चीनची प्रामाणिक संस्कृती हे कारण आहे,” असं मत दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे को-फाऊंडर एनआर नारायण मूर्ती (NR Narayana Murthy) यांनी व्यक्त केलं. सोबतच नारायण मूर्ती यांनी या गोष्टी बोलल्याबद्दल त्यांना 'देशद्रोही' म्हणू नये, असंही म्हटलं आहे. आपल्याला जलद निर्णय घेण्याची, त्वरीत अंमलबजावणी, कोणत्या समस्येशिवाय व्यवहार, व्यवहारात प्रामाणिकपणा आणि पक्षपात न करण्याची संस्कृती निर्माण करण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'एशिया इकॉनॉमिक डायलॉग'ला संबोधित करताना एनआर नारायण मूर्ती यांनी या गोष्टी सांगितल्या. “देशातील फक्त एक छोटासा वर्ग कठोर परिश्रम करतो आणि बहुतेक लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली संस्कृती आत्मसात केलेली नाही,” असे नारायण मूर्ती म्हणाले. मात्र, त्याच वेळी मूर्ती यांनी आपल्याला 'देशद्रोही' म्हणू नका, असं आवाहनही केलं.

'देशद्रोही' म्हणू नका, असं आवाहन करताना मूर्ती यांनी चीनमधील स्वतःचा अनुभव कथन केला. मूर्ती म्हणाले की, २००६ साली शांघायमध्ये एक फॅसिलिटी उभारली जाणार होती. त्यासाठी त्यांनी २५ एकर जागा निवडली आणि दुसऱ्याच दिवशी शांघायच्या महापौरांनी त्यांना ही जागा दिली. दरम्यान, भारताकडे या गतीचा अभाव असल्याचे ते म्हणाले.

“त्या ठिकाणी भ्रष्टाचार कमी आणि प्रामाणिक लोक अधिक आहेत. व्यावसायिकांनी फक्त भारतातच राहावे आणि भारतातच सर्व काही करावे असे वाटत असेल, तर मला वाटते की त्यांना ते करण्यात खूप आनंद होईल. आम्ही सर्वांना आदरपूर्वक विनंती करतो की निर्णय जलद घेतले जावेत, त्यांची त्वरीत अंमलबजावणी व्हावी आणि त्यांना कोणत्याही समस्येचा, कोणत्याही अनावश्यक अडथळ्याचा सामना करावा लागू नये,” असंही मूर्ती यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :इन्फोसिसनारायण मूर्तीव्यवसायचीन