ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - इन्फोसिसमध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात कर्मचा-यांची भरती होणार आहे. इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) युबी प्रवीण राव यांनी ही माहिती दिली आहे. तसंच नोक-या कमी झाल्याच्या बातम्या अतिशयोक्ती असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. युबी प्रवीण राव यांनी सांगितलं की, यावर्षी कंपनीत किमान 20 हजार कर्मचा-यांची भरती करण्याची योजना आहे. इन्फोसिस अनेक नोक-या निर्माण करत असून, तंत्रज्ञानात होत असलेल्या प्रगतीमुळे इन्फोसिससारख्या कंपन्यांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत.
"कर्मचारी कपात करण्याबद्दल बोलायचं झाल्यास ते परफॉर्मन्सवर आधारित असून दरवर्षी हे केलं जातं. किमान 300 ते 400 कर्मचा-यांची कपात दरवर्षी होत असते. यावर्षीही ती करण्यता आली आहे", असं प्रवीण राव यांनी स्पष्ट केलं. मात्र त्यांनी इन्फोसिसचे सह संस्थापक आणि पहिले चेअरमन एन. आर. नारायणमूर्ती यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सध्या इन्फोसिमध्ये जे काही सुरू आहे, त्यामुळे मी दु:खी झालो आहे, असे प्रतिपादनएन. आर. नारायणमूर्ती यांनी केले होते. तसंच कंपनीचे वरिष्ठ अधिका-यांनी जर आपल्या पगारात कपात केली आणि कर्मचारी प्रशिक्षणात गुंतवणूक केली तर नोक-या सुरक्षित राहतील असंही ते बोलले होते.
"कर्मचारी कपातीच्या बातम्या खूपच वाढवून सांगितल्या जात असल्याचं मला वाटत आहे. इन्फोसिसने याआधी 20 हजार कर्मचा-यांना नोकरी दिली होती आणि यावर्षीही तितक्याच कर्मचा-यांची भरती करणार आहे" असं राव यांनी सांगितलं.