नवी दिल्ली: देशात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये देशात लॉकडाऊन लागू झाला. त्याचा परिणाम उद्योगधंद्यांवर पाहायला मिळाला. उत्पादन क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसला. तर अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम सुरू केलं. त्यानंतर गेल्या वर्षभरात वर्क फ्रॉम होम चांगलंच रुजलं. कार्यालयात जाण्यासाठी आणि तिथून परतण्यासाठी करावा लागत असलेला प्रवास वाचत असल्यानं बहुतांश कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम आवडू लागलं. मात्र आता कंपन्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात बोलावू लागल्या आहेत. देशातील बलाढ्य आयटी कंपनी इन्फोसिसनं कर्मचाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत.
कार्यालयात येऊ काम करू शकता, असं इन्फोसिसनं कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे. त्यामुळे इतरही कंपन्याही इन्फोसिसच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता आहे. मात्र इन्फोसिसनं सगळ्याच कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावलेलं नाही. त्यामुळे कार्यालयातून काम सुरू करत असताना कंपनी सावध पावलं टाकत असल्याचं दिसत आहे.
देशातील लसीकरणाचा वेग वाढल्यानं सुरक्षेच्या बाबतीत देशाची स्थिती सुधारत असल्याचं इन्फोसिसनं कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या मेमोमध्ये म्हटलं आहे. याच मेमोबद्दल रॉयटर्स वृत्तसंस्थेनं इन्फोसिसची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीनं त्यांना कोणतंही उत्तर दिलेलं नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून इमर्जन्सी व्यवस्थेत काम करत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. देशातील लसीकरण वाढल्यानं स्थिती सुधारत असल्याचं कंपनीनं मेमोमध्ये नमूद केलं आहे.