नवी दिल्ली: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Infosys च्या गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार सुरू होताच इन्फोसिसचा शेअर ९ टक्क्यांनी कोसळला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ४८ हजार कोटी बुडाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच इन्फोसिसच्या शेअरमध्ये एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
चौथ्या तिमाहीतील निराशाजनक कामगिरीने इन्फोसिसचा शेअर तब्बल ९ टक्क्यांनी कोसळला. इन्फोसिसचा शेअर मार्केटमधील उच्च मूल्य असलेल्या ब्लुचिप कंपन्यांतील श्रेणीत येतो. गेल्या वर्षातील चौथ्या तिमाहीत कंपनीला अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी इन्फोसिसचा शेअर मोठ्या प्रमाणात घरसला. २३ मार्च २०२० रोजी इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, त्यानंतर शेअर सावरला आणि चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर १३ एप्रिल २०२२ रोजी इन्फोसिसचा शेअर ७ टक्के घसरणीसह १६४२ रुपयांवर आला होता. आताच्या घडीला इन्फोसिसचा शेअर १५९२ रुपयांवर आला आहे.
Infosys च्या नफ्यात १२ टक्क्यांची वाढ
Infosys ने टीसीएसपाठोपाठ चौथ्या तिमाहीत चांगल्या कामगिरीची नोंद करत ५,६८६ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद केली. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. बेंगळूरु येथे मुख्यालय असलेल्या Infosys ने गेल्या वर्षी याच काळात ५,०७६ कोटी रुपयांचा करपश्चात नफा नोंदविला होता. मात्र गेल्या तिमाहीच्या तुलनेत सरलेल्या मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात २ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या तिमाहीत कंपनीने ५,८०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. इन्फोसिस कंपनीने जानेवारी ते मार्च २०२२ या चौथ्या तिमाहीत ३२,२७६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. वार्षिक तुलनेत त्यात २३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
दरम्यान, इन्फोसिसने महसुलाच्या आघाडीवर २१ टक्क्यांची वाढ नोंदवत १,२१,६४१ कोटी रुपयांची महसूल प्राप्ती केली आहे. आधीच्या आर्थिक वर्षांत कंपनीने १,००,४७२ कोटी रुपयांचा महसूल मिळविला होता. तसेच यंदाच्या वर्षी इन्फोसिस ५० हजार फ्रेशर्सना नोकऱ्या देणार आहे. गत वर्षात कंपनीने ८५ हजार फ्रेशर्सना नोकऱ्या दिल्या होत्या.