Infosys Results : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या शेअर्सनं रॉकेट स्पीड पकडला आहे. कंपनीचे शेअर्स ७ टक्क्यांच्या तेजीसह १६०६.५५ रुपयांवर पोहोचले. १६ जुलै २०२० म्हणजे तब्बल ४२ महिन्यांनंतर एका दिवसात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. डिसेंबर २०२३ तिमाही निकालानंतर शेअर्समध्ये ही तेजी दिसून येत आहे. इन्फोसिसच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर १६२० रुपये आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १२१५.४५ रुपये आहे.
१८५० रुपयांचं टार्गेट
ब्रोकरेज हाऊसनं इन्फोसिसच्या शेअर्ससाठी १८५० रुपयांचं टार्गेट प्राईज दिसं आहे. नुवामा इन्स्टिट्युशनल इक्विटीजनं इन्फोसिसच्या शेअर्ससाठी बाय रेटिंग कायम ठेवलं आहे आणि टार्गेट प्राईज वाढवून १८५० रुपये केलंय. यापूर्वी ब्रोकरेजनं १८०० रुपयांचं टार्गेट दिलं होतं. Emkay ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेसनं इन्फोसिसच्या शेअर्ससाठी बाय रेटिंग कायम ठेवलं आहे. त्यांनी या शेअरसाठी १८५० रुपयांचं टार्गेट प्राईज दिलंय. जेफरीजनही कंपनीच्या शेअर्सला बाय रेटिंग दिलं असून टार्गेट प्राईज १७५० दिलंय. तर फिलिप कॅपिटलनं इन्फोसिसच्या शेअर्ससाठी टार्गेट प्राईज १५२० रुपयांवरून वाढवून १६९० रुपये केलंय.
६१०६ कोटींचं कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट
इन्फोसिसला आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत ६१०६ कोटी रुपयांचं कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट झालं. परंतु दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत नफ्यात १.७ टक्क्यांनी घट झाली. इन्फोसिसला आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत ६२१२ कोटी रुपयांचं नेट प्रॉफिट झालं होतं. दरम्यान, कंपनीचा महसूल ०.४ टक्क्यांनी घसरून ३८८२१ कोटी रुपये झाला. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ३८९९४ कोटी रुपये महसूल मिळाला होता.
(टीप - यामध्ये शेअर्सच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. ब्रोकरेजची मतं ही वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)