Join us

इन्फोसिसच्या शेअर्सची विक्री ही अफवाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 12:16 AM

आयटीमधील इन्फोसिस या दिग्गज कंपनीचे शेअर्स प्रमोटर्स विकणार ही अफवा असल्याचे सध्या दिसत आहे. इन्फोसिसच्या

बंगळुरू : आयटीमधील इन्फोसिस या दिग्गज कंपनीचे शेअर्स प्रमोटर्स विकणार ही अफवा असल्याचे सध्या दिसत आहे. इन्फोसिसच्या सहसंस्थापकांनी २८ हजार कोटी रुपये किमतीचे १२.७५ टक्के शेअर विकण्याची तयारी सुरू केली असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिल्यानंतर बाजारात खळबळ उडाली. मात्र, ही अफवा असून, आमचा तसा विचार नसल्याचे प्रवर्तकांनी सांगितल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.इन्फोसिससारख्या बड्या कंपनीच्या प्रवर्तकांनी शेअर्स विकल्यास बाजारात प्रचंड उलथापालथ होईल. तीन वर्षांपूर्वी प्रमोटर्सनी सक्रिय कामकाजातून अंग काढून घेतल्यावर इन्फोसिस चालविण्याच्या पद्धतीत बदल झाले म्हणून सहसंस्थापक वर्गात जास्त निराशा आहे, असे सांगण्यात येते. त्यामुळेच ते आपला हिस्सा विकणार अशी चर्चा सुरू झाली होती. सीईओ विशाल सिक्का व सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्यातील वादाचा इन्फोसिसला फटका बसणार असल्याचे बोलले जाते. सिक्का व इतर मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांचे प्रचंड पगार व कंपनी सोडणारे सीएफओ राजीव बन्सल यांना दिलेल्या मोठ्या पॅकेजवरून सहसंस्थापकांमध्ये नाराजी होती. सहसंस्थापक नारायण मूर्ती, नंदन निलेकणी, क्रिस गोपालकृष्णन, एसडी शिबुलाल व के. दिनेश यांच्याकडे इन्फोसिसच्या कोणत्याही कार्यालयीन कामकाजाची वा मोठे निर्णय घेण्याची जबाबदारी सध्या नाही.