नवी दिल्ली: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील दुसरी मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या (Infosys) समभागांच्या किमती वधारल्या आहेत. कंपनीच्या समभागांची किंमत १५ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे आज शेअर बाजार सुरू होताच पहिल्या तासाभरातच कंपनीच्या समभाग धारकांनी तब्बल ५० हजार कोटी रुपये कमावले. आज कंपनीनं तिमाहीतील नफा-तोट्याची आकडेवारी जाहीर केली. गेल्या तीन महिन्यांत कंपनीची कामगिरी अपेक्षेपेक्षा जास्त चांगली झाली. कोरोना संकट काळातही कंपनीनं १२.४ टक्क्यांचा फायदा कमावला. त्यामुळे कंपनीला झालेला फायदा ४ हजार २३३ कोटींवर जाऊन पोहोचला. याबद्दलची घोषणा होताच कंपनीच्या समभागांचं मूल्य वधारलं. त्याचा फायदा कंपनीच्या हजारो समधारकांना झाला. कोरोना संकट काळातही इन्फोसिसनं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. त्यामुळेच तिमाहीतील जमा-खर्चचा हिशोब कंपनीनं जाहीर करताच कंपनीच्या समभागांच्या किमती १५ टक्क्यांनी वाढल्या. त्यामुळे समभागांनी वर्षभरातील उच्चांकी दर गाठला. बीएसई आणि एनएसई या दोन्ही बाजारांमध्ये कंपनीच्या समभागांच्या किमती वाढल्या. आज दिवसभरात इन्फोसिसचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. इन्फोसिसच्या कामगिरीमुळे अनेकांचे अंदाज चुकल्याचं एडलवाईज रिसर्चनं एका अहवालात म्हटलं आहे.कोरोना संकटाच्या काळातही इन्फोसिसनं काही महत्त्वाची पावलं उचलली. त्यामुळे कंपनीचा नफा वाढला, अशी माहिती मुख्य आर्थिक अधिकारी प्रेम पेरेईरा यांनी दिली. अर्थ क्षेत्रावर मोठं संकट असतानाही कंपनी कर्जमुक्त आहे आणि हीच कंपनीचं सामर्थ्य असल्याचं त्यांनी सांगितलं.इन्फोसिसच्या समभागांच्या किमती यापुढेही वाढत राहणार असल्याचा अंदाज शेअर बाजारातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे इन्फोसिसचे समभाग खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी त्याच्या किमती घसरल्यावरच तसा विचार करावा, असा सल्ला शेअर बाजाराशी संबंधित तज्ज्ञांनी दिला.
कोरोना संकटात बंपर लॉटरी; इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांनी तासाभरात कमावले 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 3:38 PM