Join us  

‘ते’ पोस्टकार्ड आणि जेआरडी टाटांनी बदलली पॉलिसी, सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 7:19 PM

सुधा मूर्तीनी जेआरटी टाटांना पाठवलेल्या एका पोस्टकार्डचा किस्सा सर्वांना सांगितला. यानंतर त्यांना टाटा समूहाची पॉलिसी बदलावी लागली होती.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी 'द कपिल शर्मा शो' मध्ये अनेक किस्से सर्वांसोबत शेअर केले. सुधा मूर्ती या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूही आहेत. या मुलाखतीत त्यांनी जेआरडी टाटा यांच्याशी संबंधित एक किस्साही सांगितला, ज्यानंतर टाटा समूहाला आपलं संपूर्ण धोरण बदलावं लागलं होतं.

जेआरडी टाटा यांच्याशी निगडीत हा किस्सा सुधा मूर्तींच्या शिक्षणाशी जोडलेला आहे. सुधा मूर्ती यांनी इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिरक्स इंजिनिअरिंगमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलय. याशिवाय त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर डिग्रीही मिळवली आहे. ग्रॅज्युएशनमध्ये मिळालेल्या चांगल्या गुणांमुळे त्यांना कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी सुवर्ण पदक देऊन गौरवलं होतं.

नक्की काय घडलेलं?

खरं तर ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा सुधा मूर्ती १९७४ मध्ये कॉलेजमध्ये शिकत होत्या. त्यांना अमेरिकेत पुढील शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती, ज्याच्या तयारीत त्या व्यस्त होत्या. त्याच काळात त्यांची नजर टाटा समूहाची ऑटोमोबाईल कंपनी टेल्कोच्या (सध्याची टाटा मोटर्स) नोकरीच्या जाहिरातीवर पडली. या जाहिरातीतून एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली ती म्हणजे ही नोकरी ‘केवळ पुरुषांसाठी' आहे.

ही जाहिरात पाहून सुधा मूर्ती यांना राग आला. त्यांनी यावर आक्षेप घेण्याचा निर्णय घेतला आणि एक पोस्टकार्ड लिहिलं. परंतु ते कोणाला पाठवायचं होतं हे त्यांना माहित नव्हतं. म्हणून त्यांनी ते थेट जेआरडी टाटा यांनाच पाठवल्याचं त्या म्हणाल्या.

काय लिहिलं होतं?

त्यांनी आपल्या पत्रात टाटा समूहाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांनी केवळ पुरुषांसाठीच नोकरी यावर आक्षेप घेतला. महिला पुरूषांपेक्षा चांगलं काम करू शकतात आणि त्यांना संधी दिली गेली नाही तर आपल्याला कसं सिद्ध करतील, असं त्यांनी त्यात म्हटलं होतं. जेआरटी टाटांना सुधा मूर्ती यांचं म्हणणं पटलं आणि त्यांनी यानंतर टाटा समूहाच्या नोकरीसाठी महिलांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात केली. कंपनीनं आपलं धोरण बदललं. सुधा मूर्ती यांना टेल्कोमध्ये नोकरी मिळाली. त्या या कंपनीत नोकरी मिळवणाऱ्या पहिल्या महिला इंजिनिअर बनल्या.

टॅग्स :सुधा मूर्तीइन्फोसिसटाटा