Join us

इन्फोसिसमध्ये स्थैर्य आणणार, विसंवाद दूर करण्यावर भर देणार - नंदन निलेकणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 1:45 AM

इन्फोसिसमध्ये स्थैर्य आणणे, तसेच विसंवाद दूर करणे याला आपण प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन कंपनीचे नवे अ-कार्यकारी चेअरमन नंदन निलेकणी यांनी केले.

नवी दिल्ली : इन्फोसिसमध्ये स्थैर्य आणणे, तसेच विसंवाद दूर करणे याला आपण प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन कंपनीचे नवे अ-कार्यकारी चेअरमन नंदन निलेकणी यांनी केले.देशातील दुसºया क्रमांकाची मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांनी राजीनामा दिल्यानंतर भारत सरकारच्या आधार प्रकल्पाचे प्रमुख नंदन नीलेकणी यांना कंपनीत परत आणण्यात आले आहे. गुरुवारी रात्री त्यांनी कंपनीचे अ-कार्यकारी चेअरमनपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्यांनी कॉन्फरन्स कॉलद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.नीलेकणी यांना परत बोलावतानाच कंपनीत काही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. चेअरमन आर. शेषशायी आणि दोन स्वतंत्र संचालक पायउतार झाले आहेत. सह-चेअरमन रवी वेंकटेसन यांना स्वतंत्र संचालक करण्यात आले आहे.नीलेकणी हे गुंतवणूकदार, संचालक मंडळ आणि संस्थापक या सर्वांनाच सांभाळून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून आले. कंपनीच्या प्रशासनात सुधारणा करण्याचे मनसुबेही त्यांनी व्यक्त केले. त्यांनी म्हटले आहे की, इन्फोसिसची धोरणे आणि मिळकत यावर आताच काही बोलणे अपरिपक्वपणाचे होईल. इन्फोसिसमधील सर्वोच्च दर्जाच्या औद्योगिक व्यवस्थापनास आपण बांधील आहोत. नीलेकणी यांनी म्हटले की, कंपनीत कोणत्याही प्रकारे विसंवादी सूर निघू नये, यासाठी आपण प्रयत्न करू. ऐक्य निर्माण करण्यावरच आपला भर राहील. अ-कार्यकारी चेअरमन या नात्याने माझी भूमिका ही निगराणी करणे, व्यवस्थापन आणि परिचालन याबाबतीत लक्ष घालणे, तसेच नव्या सीईओच्या शोधात मदत करणे, या स्वरुपाची राहील. नवा सीईओ हा इन्फोसिसमधला, बाहेरचा अथवा इन्फोसिसचा माजी सदस्य असू शकतो, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. कंपनीला गरज आहे, तोपर्यंत आपण या पदावर राहू, असेही त्यांनी सांगितले.मूर्ती यांच्याबद्दल आदरनिलेकणी म्हणाले की, मी एन. आर. नारायण मूर्ती यांचा प्रशंसक आहे. ते औद्योगिक क्षेत्रातील एक दृष्टे नेते आहेत. इन्फोसिस, मूर्ती आणि अन्य संस्थापक यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध राहतील यासाठी आपण प्रयत्न करू. आॅक्टोबरमध्ये आपण कंपनीच्या धोरणांबाबतचा तपशील सादर करू शकू. सध्या तरी आपण कंपनीत संपूर्ण स्थैर्य निर्माण करण्यावरच भर देणार आहोत.