भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी इन्फोसिस (Infosys) सध्या तात्काळ कोणत्याही प्रकारचं हायरिंग करण्याच्या विचारात नसल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (TCS) चे म्हणण्यानुसार त्यांनी पुढील वर्षासाठी कॅम्पस हायरिंगची प्रक्रिया सुरू केली आहे. सलग दुसऱ्या तिमाहीत इन्फोसिसनं कॅम्पस हायरिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्फोसिस प्रत्येक तिमाहीत मागणीच्या आधारावर हायरिंग प्लॅन्सचं मूल्यांकन करेल, असं इन्फोसिसचे आऊटगोईंग चीफ फायनान्शिअल ऑफिसर निलांजन रॉय यांनी यापूर्वी सांगितलं होतं. दोन्ही कंपन्यांनी नुकतेच त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. डिसेंबर तिमाहीत दोन्ही आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.
Infosys नं काय म्हटलं?
"आम्ही युटिलायझेशन आणि आमच्या फ्लेक्सी हायरिंग मॉडेलवर लक्ष ठेवत आहोत आणि या टप्प्यावर आम्हाला कोणत्याही तत्काळ कॅम्पसची गरज नाही," अशी प्रतिक्रिया निलांजन रॉय यांनी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर दिली. व्हॉल्युममध्ये कोणतीही होण्याच्या स्थितीत कंपनीकडे अतिशय मजबूत ऑफ कॅम्पस प्रोग्राम असल्याचंही त्यांनी पुढे नमूद केलं.
कर्मचाऱ्यांची संख्या होतेय कमी
३१ डिसेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत कर्मचाऱ्यांच्या संख्या ६,१०१ नं कमी झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस कंपनीत एकूण ३२२,६६३ कर्मचारी आहेत. ही सलग चौथी तिमाही आहे, जेव्हा कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर तिमाहीमध्ये इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांची संख्या ७,५३० नं कमी होऊन ३,२८,७६४ झाली आणि ही आतापर्यंतची सर्वात मोठी घट होती.
टीसीएसचे कर्मचारीही झाले कमी
कर्मऱ्यांची संख्या सध्या इन्फोसिसमध्येच नाही, तर टीसीएसमध्येही कमी झाली आहे. देशातील सर्वात मोठी आयटी सेवा पुरवणारी कंपनी टीसीएमच्या कर्मचारी संख्येत तिसऱ्या तिमाहित ५,६८० ची घट झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या संख्येत आणखी घट होण्याची शक्यता असल्याचं टीसीएसनं यापूर्वीच्या तिमाहित नमूद केलं होतं.