नवी दिल्ली : सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असलेल्या इन्फोसिसने यंदा नवपदवीधर आयटी व्यावसायिकांच्या भरतीचे उद्दिष्ट वाढवून ते ४५ हजारांवर नेले आहे. कोविड-१९ साथीमुळे जगभरात डिजिटीकरणास वेग आला आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांची मनुष्यबळाची गरज वाढली आहे. त्यातच कंपन्यांकडून एकमेकांच्या कर्मचाऱ्यांची पळवापळवीही वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून इन्फोसिसचे कर्मचारी गळतीचे (ॲट्रिशन) प्रमाण दुसऱ्या तिमाहीत वाढून २०.१ टक्क्यांवर गेले आहे. आधीच्या तिमाहीत ते १३.९ टक्के होते. कंपनीने आपली अपेक्षित महसूलवृद्धी १४ ते १६ टक्क्यांवरून वाढवून १६.५ ते १७.५ टक्के केली आहे. राव यांनी सांगितले की, आमच्या ८६ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता आम्ही हायब्रीड कार्यपद्धती स्वीकारण्याची तयारी करीत आहोत. त्यात घरून आणि ऑफिसातून अशा दोन्ही ठिकाणांहून काम करण्याची सोय असेल. कर्मचाऱ्यांना उत्पादकता वाढविणाऱ्या साधनांनी सुसज्ज केले आहे. सायबर सुरक्षितता मिळावी, आणि कार्यजीवनात समताेल राहावा, असे वातावरण उपलब्ध केले आहे.
सुविधांमध्ये सुधारण्याची प्रक्रिया सुरूच- इन्फोसिसचे सीओओ यू. बी. प्रवीण राव यांनी सांगितले की, बाजारातील संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा यासाठी आम्ही नवपदवीधरांच्या भरतीच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. आता आम्ही ४५ हजार नवपदवीधरांची भरती करण्याचे निश्चित केले आहे. - कर्मचाऱ्यांच्या सुविधांत सुधारणा करण्याची प्रक्रियाही आम्ही सुरूच ठेवणार आहोत. त्यात आरोग्यसेवा, कल्याण उपक्रम, कौशल्य विकास, सुयोग्य भरपाई हस्तक्षेप आणि वाढीव करिअर वृद्धीच्या संधी यांचा समावेश आहे.