नवी दिल्ली : बँकांमार्फत हजारो कोटी रुपयांशी निगडित विदेशी चलनाचे अवैध हस्तांतरण करण्याच्या प्रकरणाची विविध संस्थांद्वारे चौकशी सुरू असतानाच भांडवली बाजार नियामक सेबी आणि शेअर बाजार यांनी संबंधित बँकांची चौकशी सुरू केली आहे.या बँकांनी सूचिबद्ध कंपन्यांसाठी संबंधित माहिती उघड करण्याबाबत असलेल्या नियमाचे उल्लंघन तर केले नाही ना याचा तपास सेबी आणि शेअर बाजार करीत आहेत. अशी चौकशी सुरू असलेल्या बँकांत बँक आॅफ बडोदा आणि ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स यांचा समावेश आहे. शेअर बाजाराने खासगी क्षेत्रातील एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेकडूनही खुलासा मागविला आहे. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शेअर बाजारने या सर्वांना नोटीस पाठविली असून त्यांचे उत्तर आल्यानंतर त्याचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल.या प्रकरणी कर्मचाऱ्यांची चूक आढळल्यास बँकांनी त्याची माहिती शेअर बाजाराला देणे आवश्यक आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे फार मोठे नुकसान दिसून आले नाही. त्यामुळे त्याची माहिती देणे आवश्यक नव्हते, असे या बँकांचे म्हणणे आहे. त्यातच अशी माहिती उघड केल्यास आपल्या अंतर्गत तपासावर परिणाम होईल, अशी भीतीही या बँकांनी व्यक्त केली होती.गेली अनेक वर्षे हाँगकाँग आणि अन्य काही ठिकाणी अवैध पैसा पाठविण्याशी निगडित हे प्रकरण आहे. ही रक्कम आयात न झालेल्या वस्तूंबद्दल देण्यात आली होती. या प्रकरणाचा भंडाफोड नुकताच झाला आहे.याशिवाय गाझियाबादस्थित ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्सच्या एका शाखेमार्फत ११ कंपन्यांच्या नावे ५५० कोटी रुपये हाँगकाँगला पाठविण्यात आले. २००६ ते २०१० दरम्यान, आयातीच्या नावावर ही रक्कम पाठविण्यात आली होती.या साऱ्या प्रकरणांची सीबीआय, ईडी, आयकर विभाग आणि एसएफआयओ चौकशी करीत आहेत. या प्रकरणात नावे आलेल्या बहुतेक बँका सूचिबद्ध आहेत, त्यामुळेच सेबीने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविले आहे आणि अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
विदेशी चलन अवैध हस्तांतरप्रकरणी सूचिबद्ध बँकांची ‘सेबी’कडून चौकशी
By admin | Published: October 18, 2015 11:03 PM