पडीत वार्डांच्या मुद्यावर प्रशासनाचे तळ्यात-मळ्यात आधी बंद नंतर पुन्हा कायम ठेवण्याचे आयुक्तांचे निर्देश
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
अकोला:पडीत वार्ड बंद करून आस्थापनेवरील नऊ कर्मचार्यांची प्रत्येक प्रभागात नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला. आरोग्य व स्वच्छता विभागाचे नियोजन नसल्याने साफसफाईच्या मुद्यावर प्रशासन अपयशी ठरण्याच्या शंकेने मनपा आयुक्त सोमनाथ शेटे यांनी ३१ मार्चपर्यंत पडीत वार्ड कायम ठेवण्याचे निर्देश १३ फेब्रुवारी रोजी दिले.
अकोला:पडीत वार्ड बंद करून आस्थापनेवरील नऊ कर्मचार्यांची प्रत्येक प्रभागात नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला. आरोग्य व स्वच्छता विभागाचे नियोजन नसल्याने साफसफाईच्या मुद्यावर प्रशासन अपयशी ठरण्याच्या शंकेने मनपा आयुक्त सोमनाथ शेटे यांनी ३१ मार्चपर्यंत पडीत वार्ड कायम ठेवण्याचे निर्देश १३ फेब्रुवारी रोजी दिले.शहरातील ३६ प्रभागांपैकी पडीतच्या २१ प्रभागांमध्ये (४२ वॉर्ड) साफसफाई व स्वच्छतेच्या कामासाठी मनपाने खासगी कंत्राटदारांची नियुक्ती केली. प्रभागातील नाल्या, सर्व्हिस लाइन, रस्त्यांची दैनंदिन साफसफाई करण्यासह झाडे-झुडपे, गवत काढण्यासाठी संबंधित कंत्राटदारांनी १५ खासगी सफाई कर्मचार्यांची नियुक्ती केली. याबदल्यात मनपाकडून महिन्याकाठी ५० हजार रुपयांची रक्कम अदा केली जाते. प्रशासकीय प्रभागांसह पडीत वार्डांमध्ये घाण व कचर्याचे ढीग साचले असताना अस्वच्छतेचे खापर प्रशासनाच्या मस्तकी फोडल्या जाते. यावर उपाय म्हणून पडीत वार्ड बंद करून त्याठिकाणी आस्थापनेवरील कर्मचार्यांची नियुक्ती करण्याची सूचना महापौर उज्ज्वला देशमुख यांनी प्रभारी उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणे यांना केली होती. त्यानुसार गुल्हाणे यांनी १ फेब्रुवारीपासून पडीत वार्ड बंद करीत त्याठिकाणी प्रत्येकी नऊ कर्मचार्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. महापौर, प्रशासनाच्या निर्णयावर विरोधी पक्ष काँग्रेससह खुद्द सत्तापक्षातील नगरसेवक ांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पडीत वार्ड रद्द केल्यास अस्वच्छतेची समस्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त झाल्याने प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांनी पडीत वार्ड कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते. सोमनाथ शेटे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पडीत वार्ड बंद करण्याचे निर्देश साहाय्यक आरोग्य अधिकारी सुरेश पुंड यांना दिले. दुसर्याच दिवशी ३१ मार्चपर्यंत पुन्हा पडीत वार्ड कायम ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी जारी केले. पडीतच्या मुद्यावर ठोस नियोजन नसल्याने प्रशासनाचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे.बॉक्स... स्वच्छता निरीक्षकांनी मांडले ठाण स्वच्छता विभागात २८ स्वच्छता निरीक्षक कार्यरत आहेत. धुरळणीअभावी डासांची पैदास वाढली आहे. सर्व्हिस लाइन घाणीने बरबटल्या असून, काटेरी झुडपे, गाजरगवत वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. ही जबाबदारी स्वच्छता निरीक्षकांची असून, अनेक वर्षांपासून एकाच प्रभागात ठाण मांडलेल्या स्वच्छता निरीक्षकांची उचलबांगडी करण्याची गरज आहे.कोट...पडीत वार्डातील स्वच्छतेकडे लक्ष आहे. ३१ मार्चपर्यंत पडीत वार्ड कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.-सोमनाथ शेटे, आयुक्त