नवी दिल्ली : देशातील २३ विमा कंपन्यांकडे मार्च २०१८ अखेर १५,१६७ कोटी रुपये पडून असून त्यावर कोणत्याही विमा धारकाने दावा केलेला नाही. या विमाधारकांची ओळख निश्चित करण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने या कंपन्यांना केले आहे.ज्या विमा कंपन्यांकडे ही रक्कम पडून आहे त्यात सर्वाधिक म्हणजे १०,५०९ कोटी रुपये एलआयसीकडे पडून आहेत. याशिवाय खासगी विमा कंपन्यांकडे ४,६७५ कोटी रुपये आहेत.आता केंद्र सरकारने ही रक्कम विमा पॉलिसीधारकांकडे अथवा त्यांच्या वारसांकडे पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आयसीआयसीआय प्रोडन्शिअल लाइफ इन्शुरन्स कंपनीकडे ८०७.४ कोटी रुपये, रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्सकडे ६९६.१२ कोटी, एसबीआय लाइफ इन्शुरन्सकडे ६७८.५९ कोटी आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सकडे ६५९.३ कोटी रुपये पडून आहेत.विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने आता सर्व विमा कंपन्यांना सांगितले आहे की, आपल्या वेबसाइटवर ‘सर्च’ची सुविधा देऊन ही रक्कम मूळ पॉलिसीधारकाला अथवा त्याच्या वारसाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.पॉलिसीधारकाने काय करावे?- आपल्या विमा पॉलिसीची क्लेम न केलेली रक्कम पडून तर नाही ना?- हे पॉलिसीधारकाला बघता यावे यासाठी कंपन्यांनी त्यांच्या वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने केल्या होत्या.- ही माहिती मिळवण्यासाठी पॉलिसीधारकाला पॉलिसी नंबर, पॅन नंबर, जन्म तारीख, आधार नंबर ही माहिती वेबसाईटवर द्यावी लागणार आहे.काय आहे कारण? विमा पॉलिसी घेताना बऱ्याचदा पॉलिसीधारक आपल्या कुटुंबाला याची माहिती देत नाही. त्यामुळे पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याचे वारस क्लेम करु शकत नाहीत. त्यामुळे ही रक्कम विमा कंपनीकडे पडून राहते. त्यामुळे पॉलिसीची माहिती प्रत्येकाने आपल्या कुटुंबीयांनी द्यावे, असे यातील तज्ज्ञ सांगत आहेत.
देशातील विमा कंपन्यांकडे १५,१६७ कोटी रुपये पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:09 AM