मुंबई : रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थकारणात मोठी अस्थिरता अनुभवण्यास येत असून, याचे पडसाद भारतीय अर्थकारणावरही मोठ्या प्रमाणावर उमटले आहेत. परिणामी आगामी काळात अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ७.२ टक्क्यांवर असेल. पण महागाई, चलनवाढीसह अनेक आव्हानांचा मोठा मुकाबला भारतीय अर्थव्यवस्थेस करावा लागेल, असे मत गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले. उत्तम मान्सूनच्या प्रतीक्षेसह इंधन दर नियंत्रणात येणे हे आगामी काळात कळीचे मुद्दे ठरणार आहेत. पतधोरणातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा.
मोबाइल ॲपची रिझर्व्ह बँकेकडील नोंदणी तपासा
मोबाईल ॲपद्वारे होणाऱ्या कर्ज वितरण प्रणालीमुळे सध्या अनेक फसवणुकीचे प्रकार उजेडात येत आहेत. मात्र, ग्राहकांनी अशा ॲपद्वारे कर्ज घेताना संबंधित ॲप रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत असल्याची खातरजमा करून घ्यावी. नोंदणीकृत ॲपची यादी रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. ज्या ॲपची नोंदणी नाही. तरीही जिथे ग्राहकांची फसवणूक झालेली आहे, अशा लोकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करावे. चलनवाढ ६.७% राहणार चालू वर्षात एप्रिल ते जून या कालावधीमध्ये चलनवाढीचा दर हा ७.५ टक्के इतका होता. मात्र, चलनवाढ नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांमुळे हा दर ६.७ टक्क्यांपर्यंत आटोक्यात येईल, असा अंदाज वर्तविला आहे.
पुढील महिन्यात पुन्हा होणार बैठक
गेल्या दोन महिन्यांत दोनवेळा व्याजदरात वाढ केल्यानंतर, आता ४ ऑगस्टला पुढील पतधोरण समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत पुन्हा किमान ०.२५ टक्के ते ०.४० टक्के दरवाढ होण्याचा अंदाज बँकिंग वर्तुळात व्यक्त होत आहे.
मान्सूनमुळे दिलासा मिळेल
यंदा मान्सूनची स्थिती सामान्य असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे धान्योत्पादन उत्तम होईल. परिणामी, ग्रामीण तसेच शहरी भागांतून महागाई नियंत्रणात येण्यास मदत होईल.
मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ होणार
बुधवारी अर्धा टक्का रेपो रेटे वाढवल्यानंतर आता पुन्हा एकदा बँकेतील बचत खात्यावरील व्याज आणि मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.