लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गृह, वाहन कर्जाच्या व्याजदर वाढीने ग्राहक त्रासलेले असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, व्याजदर वाढ रोखणे माझ्या हातात नाही. त्यावेळी जी स्थिती असेल त्यावर व्याजदर वाढीचा निर्णय घेण्यात येईल. एप्रिलमध्ये, आरबीआयने रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवून सर्वांना धक्का दिला होता.
मे २०२२ पासून आरबीआयने रेपो दरात तब्बल अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे. त्याचा मोठा फटका सामान्य गृहकर्जदारांना बसत आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना गव्हर्नर दास म्हणाले की, केंद्रीय बँकेने आगामी बैठकांमध्ये रेपो दरात वाढ करू नये, अशा सूचना आल्या आहेत. मात्र ते माझ्या हातात नाही. ते त्यावेळेच्या स्थितीवर अवलंबून असते.
महागाई कमी झाली आहे मात्र, समाधानी राहणे चुकीचे ठरेल. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आणखी पावले उचलण्यात येतील, असे दास म्हणाले.
दोन हजारांच्या नोटा विनाअडथळा मागे घेणार
n २,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण केली जाईल.
n आरबीआय परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती दास यांनी दिली. रिझर्व्ह बँकेने गेल्या शुक्रवारी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती.
n तथापि, मध्यवर्ती बँकेने हेदेखील स्पष्ट केले होते की ही नोटबंदी नाही व २,००० रुपयांची नोट कायदेशीररीत्या चालू राहील. लोक पेमेंट करण्यासाठी तिचा वापर करू शकतात.
दोन हजारांची
नोट का बंद केली?
दास यांनी सांगितले की, दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय सर्वेक्षणानंतर घेतला आहे. या नोटांचा सर्रास वापर होत नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आले होते. त्यामुळे नोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारतासमोर आव्हान काय?
दास म्हणाले की, एकेकाळी अचल संपत्ती ही बँकांसाठी चिंतेची बाब होती; परंतु आता त्या चिंता कमी झाल्या आहेत, हे चांगले लक्षण आहे. याशिवाय बँकेकडून कर्ज घेण्याचे प्रमाणही वाढले आहे.
ताज्या आकडेवारीनुसार ते १५.५ टक्के होते. भारतातील लोकसंख्या ही मोठी संधी आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
असे असले तरी जागतिक स्तरावर अचानक घडलेले कोणतेही कारण भारतावर परिणाम करू शकेल. निर्यातीतील मंदी हे एक आव्हान आहे. अल निनो आणखी एक धोका आहे, असेही ते म्हणाले.
पूर्वी महागाई कमी झाली होती. मात्र, रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्याने अचानक परिस्थिती उलट झाली. यामुळे जागतिक पुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली आणि वस्तूंच्या किमती वाढल्या. मात्र, त्यानंतर आरबीआयने तत्काळ पावले उचलल्याने महागाई वाढ रोखण्यात यश येत आहे. महागाई रोखण्याची मोहीम संपली नसून, आरबीआय दक्ष आहे. - आरबीआय गव्हर्नर