नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आगामी दोन महिन्यांसाठीच्या पतधोरणाची घोषणा गुरुवारी केली जाणार आहे. देशातील वाढती चलनवाढ
लक्षात घेता यावेळी व्याजदरामध्ये कपात होण्याची शक्यता नसल्याचे मत या क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कोरोनामुळे अडचणीत असलेल्या औद्योगिक क्षेत्राला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी काही घोषणा होण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यही मुद्रा नीती समितीची बैठक २९ सप्टेंबरला सुरू होणार असून, त्यातील निर्णयांची घोषणा १ आॅक्टोबर रोजी केली जाणार आहे. मागील बैठकीत वाढती चलनवाढ रोखण्यासाठी बँकेने कोणत्याही दरामध्ये बदल केलेले नाही. दरम्यानच्या काळात चलनवाढीच्या दरात थोडी वाढ झाली असली तरी यावेळीही व्याजदरामध्ये कपात केली जाण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञ सांगतात
सीआयआयने व्याजदरात कपात करण्याची जोरदार मागणी केली असून, त्यामुळे उद्योगांना फायदा होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. इक्राच्या अर्थतज्ज्ञांनी सप्टेंबर महिन्यात चलनवाढीत वाढ शक्य असल्याचे सांगून रिझर्व्ह बँक व्याजदर कायम ठेवेल, अशी अशा व्यक्त केली.
हत्यारे समजदारीने वापरण्याची ग्वाही
च्रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी, आमच्याकडे अद्यापही विविध हत्यारे असून, अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी गरजेनुसार त्यांचा वापर समजदारीने केला जाणार असल्याचे प्रतिपादन यापूर्वीच केले आहे. त्याच वेळी त्यांनी प्रत्येक वेळी व्याजदर कपात हा उपाय असू शकत नसल्याचे सांगितले. त्यामुळे यावेळी व्याजदर कायम राहण्याची अटकळ बांधली गेली.