मुंबई : भारतातील सर्वांत मोठी बँक असलेली स्टेट बँक आॅफ इंडिया आणि अन्य काही बँका नव्या वर्षात जानेवारीच्या सुरुवातीलाच व्याजदर कपातीची घोषणा करू शकतात, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.प्राप्त माहितीनुसार, नोटाबंदीमुळे लोक बिन महत्त्वाच्या गोष्टींवर पैसे खर्च करेनासे झाले आहेत. नोटांची तीव्र टंचाई असल्यामुळे लोकांनी खर्चात मोठ्या प्रमाणात काटकसर सुरू केली आहे. त्यामुळे मागणी घटली आहे. बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर या स्थितीत सुधारणा होईल. मागणी वाढेल. नोटाबंदीमुळे कर्जाची मागणीही घटली आहे. विशेषत: कॉर्पोरेट कर्जात घसरण झाली आहे. त्यामुळे बँकांना व्याजदरांत कपात करणे आवश्यकच आहे. व्याजदर घटल्यानंतर कंपन्यांच्या उत्पादन खर्चात कपात होईल. त्याचा लाभ होऊन वाहनांसारखी उत्पादने स्वस्त होतील. तसेच खरेदीदारांच्या कर्जाचे हप्तेही कमी होतील.एका बँकेच्या प्रमुखाने सांगितले की, कर्जाचा व्याजदर कमी केल्यास त्याचा परिणाम म्हणून बचतीवरील व्याजदरही कमी होतील. बचत खात्यातील पैशावर किती व्याज मिळावे, यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही सरकारी यंत्रणा नाही. तथापि, बहुतांश सर्व खाजगी बँकांनी हा दर ४ टक्के ठेवला आहे. त्यात कपात होऊ शकते. (वाणिज्य प्रतिनिधी)कर्जाची मागणी कमीचनोटाबंदीनंतर असंख्य ग्राहकांनी आपल्या कर्जांची परतफेड केली आहे. त्यापैकी अनेकांनी पुन्हा कर्ज घेण्याचे टाळले आहे. नवीन कर्ज घेणाऱ्यांची संख्याही घटली आहे. अशा प्रकारे कर्जाची मागणी घटलेली असतानाच बँकांमध्ये अब्जावधी रुपये जमा झाले आहेत. त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी व्याजदरांत कपात करावीच लागेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.- व्याजदर कपातीची शक्यता वाढली असली, तरी नव्या वर्षात बँकांतून पैसे काढण्याच्या मर्यादेत सुधारणा होण्याची शक्यता नाही. - व्याजदरांत कपात केल्यानंतर मागणीला बळ मिळेल, असे बँकांना वाटते. एसबीआयचा कर्जावरील किमान व्याजदर सध्या ८.९0 टक्के आहे. तो देशातील सर्वांत कमी दर आहे.- जुन्या नोटा बँकांत जमा करण्याची मुदत ३0 डिसेंबर रोजी संपत आहे. मोठ्या बँकांच्या काही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात वित्तमंत्र्यांशी चर्चा केली, तेव्हा त्यांनी संभाव्य व्याजदर कपातीचे संकेत दिले.
व्याजदर घटणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2016 1:51 AM