ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.7- भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. या पतधोरणात रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे आधीचा रेपो रेटच कायम राहणार आहे. आधी 6.25 टक्के इतका रेट होता आताही तोच रेट कायम राहणार आहे. तर रिव्हर्स रेपो रेटसुद्धा कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्यातरी गृहकर्जासह इतर कर्जांवरील व्याजदरात कोणता बदल होण्याची शक्यता नाही. याशिवाय सीआरआरही चार टक्क्यांवर कायम ठेवला आहे. आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने मुद्रांकाच्या केलेल्या समिक्षा आणि एकूण पडताळणीनंतर हा निर्णय घेतला आहे.
आरबीआयचा व्याजदर गतवर्षी प्रमाणे जैसे थेच राहिल्यामुळे तूर्तास तरी गृहकर्जासह इतर कर्जांवरील व्याजदरात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भातही भाष्य केले. कर्जमाफी झाल्यास वित्तीय तुटीवर दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे सरकारने याबाबतचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा, असे उर्जित पटेल यांनी सांगितले.
स्टॅचुटेरी लिक्विडिटी रेशो (एसएलआर)चा असलेला 20.50 टक्क्यांवरुन कमी करुन तो 20टक्के करण्यात आला आहे. मॉनिटरी पॉलिसी कमिटीने एमएसएफ आणि बँक दर 6.5 टक्के कायम ठेवला आहे. चालू आर्थिक वर्षांमध्ये पहिल्या सहा महिन्यात महागाई दोन टक्क्यांवरुन 3.5 टक्के होई शकतो. तर त्यानंतरच्या सहा महिन्यात 3.5 टक्क्यांवरुन 4.5 टक्के होण्याची शक्यता आहे. मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये असलेल्या पाच सदस्यांनी रेपो दर कायम ठेवण्याच्या बाजूने मतदान केल्यामुळे व्यजदर जैसे थे राहिला. एमपीसीच्या अंदाजानुसार, जीडीपीचा ग्रोथ 0.1ने कमी झाल्यामुळे 7.4 वरुन 7.3 करण्यात आला.