मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाने बचत खात्यांवरील व्याजदरांत कपात केली असून, व्याजदर रचनाही दोन टप्प्यांची केली आहे. या निर्णयामुळे ९0 टक्के ग्राहकांच्या बचत खात्यावरील व्याजदर कमी होणार आहे. अनेक देशांत द्विस्तरीय व्याजरचना आहे. भारतात ती प्रथमच लागू होत आहे.खातेदारांना ३१ जुलैपासून १ कोटी व त्यापेक्षा कमी रक्कम जमा असलेल्या बचत खात्यांवर वार्षिक ३.५ टक्के दराने व्याज मिळेल, तर १ कोटीपेक्षा जास्त रक्कम असल्यास पूर्वीप्रमाणेच ४ टक्के व्याज मिळेल, असे बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सूत्रांनी सांगितले की, एसबीआयमधील ९0 टक्के खात्यांवर १ कोटीपेक्षा कमी शिल्लक आहे.बँकेने आपल्या निवेदनात म्हटले की, कमी झालेला महागाईचा दर आणि उच्च पातळीवरील वास्तविक व्याजदर यामुळे बचत खात्यांवरील व्याजदरांत सुधारणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे व्याजदरावर आधारित निधी खर्चात (एमसीएलआर) कपात करणे शक्य होईल. बँकेचा १ जुलैपासूनचा एमसीएलआर ७.७५ टक्क्यांवर आहे.या निर्णयाची घोषणा होताच एसबीआयच्या समभागांनी शेअर बाजारात ४.७५ टक्क्यांची उसळी घेतली. बुधवारी होणाºया पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेकडून धोरणात्मक व्याजदरात कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एसबीआयच्या व्याजदर कपातीला ही पार्श्वभूमीही आहे, असे सूत्रांनी सांगितले.
एसबीआयने कमी केले बचत खात्यांचे व्याजदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 1:17 AM