नवी दिल्ली : अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पामधून मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा फलद्रूप झाली आहे. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांवरून पाच लाख रुपये करण्याची घोषणा पीयूष गोयल यांनी केली आणि संपूर्ण सभागृहाने जोरदार बाके वाजवून त्याला प्रतिसाद दिला. या घोषणेनंतर शेअर बाजारातही मोठी उसळी बघावयास मिळाली.सध्या अडीच लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त होते. त्यामध्ये दुपटीने वाढ करीत ते पाच लाख रुपये करण्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आणि सभागृहामध्ये आनंदाची उधळण झाली. स्टँडर्ड डिडक्शन 40 हजारांवरुन 50 हजार रुपये करण्यात आले. याशिवाय आयकर कायद्याच्या ८० सी कलमाखाली असलेल्या विविध योजनांमधील दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यास साडेसहा लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त होणार आहे.
त्याशिवाय गृहकर्जावरील व्याजावर असलेली दोन लाख रुपयांपर्यंतची करांची सूट तसेच आरोग्य विमा योजनेला असलेली कर सवलत, नोंदणीकृत धर्मादाय संस्थांना दिलेली देणगी अशा अन्य मार्गांनीही करबचत होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.गोयल यांच्या या घोषणेला शेअर बाजारातही पाठबळ मिळाले आहे. लोकसभेत झालेल्या घोषणेनंतर शेअर बाजारात तेजीचा वारू उसळला आणि संवेदनशील निर्देशांक सुमारे 400 अंशांपर्यंत वर जात त्याने 36,700ची पातळी गाठली.