दिल्ली : यापुढे देशांतर्गत विमानातून प्रवास करतानाही प्रवाशांना वाय-फायचा वापर करता येणार आहे. केंद्र सरकारने तशी परवानगी दिली असून, ‘ही सेवा देणारी विस्तारा’ही पहिली विमान कंपनी असेल. आतापर्यंत विमानात वाय-फाय सेवा नव्हती आणि स्मार्टफोनही फ्लाइट मोडमध्ये सुरू ठेवायलाच संमती होती.
विमान प्रवासात प्रवाशाचा स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्टवॉच वा पीओएस फ्लाइट मोडमध्ये असेल, तर त्याला वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्याचा अधिकार वैमानिकाला असेल, असे केंद्र सरकारकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.
विमानात ही वाय-फाय सेवा मिळणार असल्याने प्रवाशांना इंटरनेटचा वापर करून व्हिडीओ पाहणे, चॅट करणे, तसेच संभाषण करणे आता शक्य होणार आहे. वाय-फायशिवाय मात्र हे करणे शक्य होणार नाही. ‘विस्तारा’च्या विमानांत ही सेवा देण्यासंदर्भात पॅनासॉनिक एव्हिओनिक्स आणि टाटा समूहाच्या नेल्को लिमिटेड यांच्यात अलीकडेच करार झाला होता.
त्यामुळेच एअर विस्तारामध्ये वाय-फायची सेवा सर्वात आधी मिळू शकणार आहे. कंपनीच्या बोइंग ७८७-९ या ड्रीमलाइनरमध्ये प्रवाशांना आम्ही सुविधा देऊ, असे विस्ताराने म्हटले आहे. मात्र, टप्प्याटप्प्याने देशातील अन्य विमान कंपन्यांनी निश्चितच ही सेवा आपल्या प्रवाशांना देतील.
विमानांत वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्याचा पूर्ण अधिकार वैमानिकाला असणार आहे, तसेच वाय-फाय सेवा नसताना स्मार्टफोनचा वापर करता येणार नाही. म्हणजे मोबाइलद्वारे विना वाय-फाय संभाषण करता येणार नाही.
गेल्या वर्षी केंद्र सरकारने विमानांत मोबाइल संभाषण करण्यास संमती द्यावी, असा विचार केला होता. तसा मसुदाही तयार आहे, पण त्यावर सध्या निर्णय घेण्यात आलेला नाही.
देशांतर्गत विमान प्रवासातही आता इंटरनेट मिळणे शक्य
आतापर्यंत विमानात वाय-फाय सेवा नव्हती आणि स्मार्टफोनही फ्लाइट मोडमध्ये सुरू ठेवायलाच संमती होती.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 05:10 AM2020-03-03T05:10:58+5:302020-03-03T05:11:05+5:30