नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये सातत्याने घसरण होत असल्याने आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण पसरले आहे. मात्र रुपयाच्या घसरत्या किमतीमुळे भारतासारख्या अर्थव्यवस्थेला घाबरून जाण्याचे कारण नाही. रुपयाच्या किमतीसाठी देशांतर्गत बाब नव्हे तर आंतरराष्ट्रीय कारणे जबाबदार असल्याचे जेटली यांनी सांगितले आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर जेटली यांनी ही माहिती दिली. रुपयाच्या घसरत्या किमतीविषयी अरुण जेटली यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जेटली म्हणाले, " जर तुम्ही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाबींचा आढावा घेतला तर रुपयाच्या घसरणीमागे कुठलेही देशांतर्गत कारण नसल्याचे तुमच्या निदर्शनास येईल. जागतिक पातळीवर डॉलरच्या तुलनेत सगळ्याच चलनांची किंमत कमी झाली आहे. मात्र अशा परिस्थितीतही रुपयाच्या मूल्यामध्ये फारशी घसरण झालेली नाही. अमेरिकेच्या भक्कम धोरणांमुळे डॉलर मजबूत झाला आहे. मात्र भारताची अर्थव्यवस्थाही वेगाने विकसित होत असल्याने आपल्याला घाबरून जायचे कारण नाही."
रुपयाच्या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय कारणे, चिंता करू नका - अरुण जेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 10:46 PM