नवी दिल्ली- मोदी सरकारनं अंतरिम अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, मजूर आणि गरीब, मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपल्याला कमी गुंतवणुकीत निवृत्तीच्या वयात हमखास पेन्शन पाहिजे असल्यास मोदी सरकारची ही नवी योजना फायदेशीर ठरणार आहे.असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी पीयूष गोयल यांनी अशा योजनेची घोषणा केली असून, या योजनेत गुंतवणूक केल्यास वय वर्षं 60नंतर आपल्याला एक निश्चित रक्कम पेन्शनच्या स्वरूपात मिळणार आहे. ही योजना पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना म्हणजे PMSYMच्या अंतर्गत येते. जाणून घेऊया कसा होतो या योजनेतून फायदा...
- काय आहे योजना
सरकारनं अंतरिम अर्थसंकल्पात गरीब कामगारांना मोठं गिफ्ट दिलं होतं. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला ज्याचा पगार 15 हजारहून कमी आहे, त्याला सरकारनं महिन्याकाठी पेन्शन देणार आहे.
- कोणाला मिळणार फायदा
या योजनेचा 5 वर्षांत असंघटित क्षेत्रातील 10 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा पोहोचणार आहे. ही योजना येत्या 5 वर्षांत असंघटित क्षेत्रातील जगातली सर्वात मोठी पेन्शन योजना म्हणूनही नावारुपाला येऊ शकते. सरकारनं या योजनेसाठी सुरुवातीला 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. योजनेचा अनेक जणांनी लाभ घेतल्यानंतर निधीही वाढवण्यात येणार आहे.
- किती करावी लागणार गुंतवणूक
जर एखादी व्यक्ती 29 वर्षांची आहे. तर त्या व्यक्तीला वय वर्षं 60पर्यंत दर महिन्याला 100 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. जर एखादा कर्मचारी 18 वर्षांपासून या योजनेत गुंतवणूक करणार असेल तर त्याला महिन्याकाठी 55 रुपये गुंतवावे लागणार आहेत. चालू आर्थिक वर्षं 2018-19मध्ये ही योजना लागू होणार आहे.