दर महिन्याला पाचशे ते हजार रुपये गुंतवायचेत, पण रिस्क नकोय... थोडे उशिरा का होईना, पण चांगले रिटर्न हवेत... असा गुंतवणुकीचा पर्याय अनेक जण शोधत असतात. कर्जाचा हप्ता, घरखर्च आणि इतर छोटे-मोठे खर्च जाऊन जी मोजकी रक्कम उरते, ती सुरक्षित ठिकाणीच गुंतवण्याबाबत आपण मध्यमवर्गीय आग्रही असतो. अशा आपल्यासारख्या 'पब्लिक'साठी स्टेट बँकेचं पीपीएफ - पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खातं अत्यंत उपयुक्त ठरणारं आहे. कसं ते जाणून घेऊ या.
* पीपीएफमधीलगुंतवणूक ही 'ईईई' गटात येते. म्हणजेच, गुंतवणूक करतेवेळी, गुंतवलेल्या रकमेवर व्याज जमा होत असताना आणि शेवटी पैसे काढताना आपली रक्कम करमुक्त असते. असाच फायदा आपल्याला फिक्स्ड डिपॉझिट, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवरही मिळतो.
* स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपण स्वतःच्या नावाने, तसंच आपल्या मुलांच्या नावाने पीपीएफ खातं उघडू शकतो.
* किमान ५०० रुपये आणि कमाल दीड लाख रुपये गुंतवून आपण स्टेट बँकेत पीपीएफ खातं उघडू शकतो. ही रक्कम कशी जमा करायची, एकरकमी की हप्त्यांमध्ये हे आपण ठरवू शकतो. परंतु, गुंतवणुकीची वार्षिक मर्यादा दीड लाख रुपये आहे. त्यापेक्षा अधिक रक्कम गुंतवल्यास त्यावर व्याजही मिळत नाही आणि करसवलतीचा फायदाही नाही. पीपीएफमधील जमा रकमेवर सध्या ५ टक्के व्याज मिळतंय.
* पीपीएफमधील गुंतवणुकीचा लॉक-इन पीरियड १५ वर्षांचा आहे. तो आपण २० वर्षांपर्यंत वाढवूही शकतो.
* पीपीएफ खात्यातील जमा रकमेवर आपल्याला कर्जही मिळू शकतं. अर्थात, आपलं खातं किती वर्षांपासून आहे आणि त्यात किती रक्कम जमा आहे, यावर ते ठरतं.
* पीपीएफ खात्यासाठी एक किंवा त्याहून अधिक व्यक्तींनाही आपण 'नॉमिनी' ठेवू शकतो. इतकंच नव्हे तर, कुणाला किती टक्के हिस्सा द्यायचा हेही ठरवू शकतो. पीपीएफ खातं एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.
* १५ वर्षांचा लॉक-इन पीरियड कदाचित काही जणांना जास्त वाटू शकतो. कारण, पैशांची गरज कधी भासेल, हे सांगता येत नाही. म्हणूनच, ही रक्कम मॅच्युरिटीआधी काढण्यास सशर्त परवानगी देण्यात येते. आपल्या खात्याला किमान पाच वर्षं पूर्ण झालेली असतील आणि वैद्यकीय उपचारासारखं ठोस कारण असेल तरच ही रक्कम मुदतीआधी मिळू शकते.