नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांना दुबईला चाललेल्या विमानातून नाट्यमयरीत्या उतरवून ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई विमानतळावर शनिवारी हे नाट्य घडले. जेट एअरवेज बंद पडल्यानंतर कंपनीतील निधी वळविल्याच्या आरोपांची चौकशी सुरू करण्यात आली असल्यामुळे गोयल यांना विदेशी जाण्यापासून रोखण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, गोयल दाम्पत्यास देश सोडून जाऊ देऊ नका, अशा लेखी सूचना मुंबई विमानतळावरील आव्रजन शाखेला (इमिग्रेशन ब्रँच) आधीच मिळालेल्या आहेत. सरकारकडून मिळालेल्या सूचना आणि गोयल दाम्पत्याच्या पासपोर्टवरील नाव यात स्पेलिंगची तफावत होती. त्यामुळे गोयल दाम्पत्य दुबईला जाणाऱ्या विमानात जाऊन बसण्यात यशस्वी झाले. तथापि, हा प्रकार काही अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांना एमिरेटस् एअरलाईन्सच्या विमानातून उतरवून ताब्यात घेण्यात आले.एका सरकारी अधिकाºयाने सांगितले की, ‘विदेशी जाण्याची घाई कशासाठी? चौकशी पूर्ण होऊ द्या. मग जा.’सूत्रांनी सांगितले की, जेट एअरवेजकडे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँक समूहाचे ८,५०० कोटी रुपये थकले आहेत. कंपनीवरील एकूण देणे २० हजार कोटींपेक्षा जास्त आहे.या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयाकडून गोयल यांच्या प्रकरणात लक्ष घालण्यात आले आहे. जेट एअरवेजप्रकरणी बँकांच्या भूमिकेबाबत अद्याप तरी कोणतीही चौकशी केली जात नाही. कारण जानेवारीपर्यंत जेटकडून कर्जाचे हप्ते नियमित भरले जात होते.>एतिहादच्या गुंतवणुकीची चौकशीसूत्रांनी सांगितले की, विदेशी भागीदार कंपनी एतिहाद एअरवेजने जेटमध्ये केलेल्या गुंतवणुकीत एफडीआय नियमांचा भंग झाला आहे का, याचा तपास ईडीकडून याआधीच सुरू करण्यात आला आहे. त्यानंतर आता कंपनीचा निधी अन्यत्र वळविण्यात आला आहे का, याचाही तपास केला जात आहे. जेट एअरवेजच्या आर्थिक व्यवहारांचे गंभीर घोटाळे तपास कार्यालयामार्फत चौकशी करण्याचा निर्णय अजून कंपनी व्यवहार मंत्रालयाने घेतलेला नाही. तथापि, कंपनीच्या व्यवहारांत काही त्रुटी असल्याचे कंपनी निबंधकांना आढळून आले आहे.जेटच्या समभागांचा स्रोत आणि जेटची अन्य कंपन्यांतील गुंतवणूक हा एक अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. कंपनीच्या सुरुवातीच्या काही गुंतवणूकदारांबाबत अनेक प्रश्न आहेत.
चौकशी सुरू असल्याने गोयल यांना विदेशी जाण्यापासून रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 4:20 AM