Join us

प्रॉव्हिडंट फंडाची शेअर बाजारात प्रथमच गुंतवणूक

By admin | Published: August 06, 2015 10:34 PM

देशातील सुमारे सहा कोटी नोकरदारांच्या भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) गुरुवरी प्रथमच ऐतिहासिक धाडसी

मुंबई : देशातील सुमारे सहा कोटी नोकरदारांच्या भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) गुरुवरी प्रथमच ऐतिहासिक धाडसी पाऊल टाकत शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.‘ईपीएफओ’ने आपल्या गुंतवणुकीचा श्रीगणेशा स्टेट बँक म्युच्युअल फंडाच्या ‘एसबीआय निफ्टी ईटीएफ’ आणि ‘एसबीआय सेन्सेक्स ईटीएफ’ या दोन ‘एक्स्चेंज ट्रेडेड फंड’पासून मुंबईत केली. या दोन्ही फंडांमध्ये नेमकी किती रक्कम गुंतविण्यात आली हे लगेच स्पष्ट झाले नाही.केंद्र सरकारने गेल्या एप्रिलमध्ये ‘ईपीएफओ’साठी नवी गुंतवणूक पद्धत मंजूर केली असून त्यानुसार दरवर्षी जमा होणाऱ्या जास्तीच्या निधीपैकी ५ ते १५ टक्के रक्कम शेअर बाजारात गुंतविण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र शेअर बाजारातून गुंतवणुकीत धोका जास्त असल्याने आणि ‘ईपीएफओ’ला अशा प्रकारच्या गुंतवणुकीचा पूर्वानुभव नसल्याने संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने सुरुवातीस ही गुंतवणूक पाच टक्क्यांवर मर्यादित करण्याचे ठरविले आहे.गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी ‘ईपीएफओ’कडे एप्रिल ते जून या तिमाहीत सरासरी दरमहा सुमारे ८,२०० कोटी रुपयांचा जास्तीचा निधी जमा झाला आहे. याच्या पाच टक्के म्हणजे सुमारे ४१० कोटी रुपये दरमहा शेअर बाजारात गुंतविण्यासाठी उपलब्ध होऊ शकतील. वाढीव निधीचे हेच प्रमाण पुढेही कायम राहिले तर वर्षभरात ‘ईपीएफओ’कडून अशा प्रकारे शेअर बाजारात पाच ते सहा हजार कोटी रुपये गुंतविले जाऊ शकतील. यानुसार ‘ईपीएफओ’ने आॅगस्ट महिन्यासाठीची सर्व संभाव्य रक्कम गुरुवारी गुंतविली, की त्याचा काही हिस्सा गुंतविला हे स्पष्ट झाले नाही. मात्र आता एकदा सुरुवात केल्यावर ‘ईपीएफओ’ अशा प्रकारे ठराविक कालांतराने नियमितपणे गुंतवणूक करीत राहील, अशी अपेक्षा आहे. सहा कोटी नोकरदारांच्या पगारातून दरमहा कापल्या जाणाऱ्या प्रॉव्हिडंट फंडाच्या हप्त्याच्या रूपाने ‘ईपीएफओ’कडे सुमारे साडेआठ लाखकोटी रुपयांचा निधी जमा आहे.विविध प्रकारचे परतावे वगळले तर यापैकी सुमारे पाच लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी उपलब्ध होतात. हा निधी पूर्र्णपणे सरकारी नियंत्रणाखाली असल्याने व गुंतवणूक पूर्णपणे निर्धोकच असावी, हे मुख्य सूत्र ठेवल्याने इतकी वर्षे हा सर्व पैसा केंद्र व राज्य सरकारांच्या रोख्यांमध्ये गुंतविला जात राहिला; परंतु अशा गुंतवणुकीतून मिळणारा परतावा ८-९ टक्क्यांपेक्षा जास्त मिळत नाही.महागाईचा दरही साधारणपणे याच प्रमाणात असल्याने अधिक परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या इतर पर्यायांच्या तुलनेत प्रॉ. फंड हा पर्याय अनाकर्षक ठरू लागला. विशेष म्हणजे सरकारने सर्वांसाठी सुरू केलेली ‘न्यू पेन्शन स्कीम’ (एनपीएस) शेअर बाजारात गुंतवणूक करते व त्यामुळे तेथे परतावा जास्त मिळतो.या पार्श्वभूमीवर सरकारी ‘ईपीएफओ’लाही धोका पत्करण्याची मानसिकता ठेवून अल्प प्रमाणात का होईना; पण शेअर बाजारातील गुंतवणुकीस सुरुवात करावी लागली आहे. (प्रतिनिधी)