कोणत्याही व्यक्तीला गुंतवणुकीवर चांगला परतावा हवा असतो. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं हा एक उत्तम निर्णय असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याद्वारे तुम्ही फक्त ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. एसआयपीद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला मोठा परतावा मिळवून देऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडांना सरासरी १२ टक्के परतावा मिळू शकतो.
काय आहेत फायदे?फ्रँकलिन टेम्पलटन यांच्या मते, म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये तुमचा पैसा चक्रवाढ पद्धतीनं वाढतो. त्यात महागाईवर मात करण्याची आणि दीर्घकाळ संपत्ती निर्माण करण्याची क्षमता आहे. एसआयपीद्वारे (Systematic Investment Plan) तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय गाठण्यासाठी पद्धतशीर आणि शिस्तबद्ध पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं गुंतवणूक करण्याची संधी मिळते.
यामध्ये तुम्ही फंड (Mutual Funds) केव्हा खरेदी किंवा विक्री करणार याची चिंता न करता बाजारातील चढ-उतारांमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करता. बाजार खाली असताना म्युच्युअल फंड आपोआप अधिक युनिट्स खरेदी करतात. एकंदरीत, तुमच्या पैशांचं मॅनेजमेंट प्रोफेशनल फंड मॅनेजर्सद्वारे केलं जातं. ते यातील तज्ज्ञ असतात आमि त्यांच्याकडे तुमच्या गुंतवणूकीला मॅनेज करण्याचं काम सोपवलं जातं.
एसआयपी कॅलक्युलेशनGroww च्या एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार, जर तुम्ही मासिक एसआयपीमध्ये १० वर्षांसाठी १०,०० रुपये गुंतवले, तर सरासरी १२ टक्के परताव्यानुसार, तुम्हाला मॅच्युरिटीवर परतावा म्हणून ११,२३,३९१ रुपये मिळतील, तर तुमची वास्तविक गुंतवणूक १२,००,००० असेल. अशा प्रकारे, मॅच्युरिटीवर तुमच्याकडे एकूण एकरकमी २३,२३,३९१ रुपये असतील. दरम्यान, हे रिटर्न बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असतात.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)