कोलकाता : महाराष्ट्रात व्यावसायिक गुंतवणूक करण्याची क्षमता संपलेली असून उद्योजकांनी आता देशातील इतर राज्यांमध्ये गुंतवणूक करावी. पश्चिम बंगाल हे त्यासाठी उत्तम पर्याय आहे, असे उद्गार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज येथे काढले.कोलकाता येथे मंगळवारी दोन दिवसीय बंगाल जागतिक उद्योग परिषद सुरू झाली आहे. यानिमित्ताने राज्यातील गुंतवणूक वाढावी, असा ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. मुकेश अंबानी यांनी त्या राज्यात गुंतवणूक करण्याची घोषणा कालच केली, तर अदानी समूहाने पश्चिम बंगालमध्ये ७५0 कोटी रुपयांची घोषणा बुधवारी केली.त्या परिषदेचे उद््घाटन करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, महाराष्ट्र हा देशातील अन्य राज्यांपेक्षा प्रगत आहे. देशाची आर्थिक राजधानी या राज्यात आहे. महाराष्ट्राविषयी संपूर्ण आदर बाळगूनही असे म्हणावेसे वाटते की, या राज्यात व्यावसायिक गुंतवणूक करण्याची क्षमता आता संपली आहे. पश्चिम बंगाल हे आसियान देशांचे प्रवेशद्वार आहे. या राज्याला लागून बांगलादेश, नेपाळ, भूतान हे देश आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक केल्यास उद्योगांना मोठा फायदा होऊ शकतो. पश्चिम बंगालमध्ये ३४ वर्षे अराजकी राज्य होते. पण आता सत्तांतर झाले आहे. या राज्याला प्रगतिपथावर नेण्याचा आम्ही कसून प्रयत्न करीत आहोत. आमच्या राज्यात भेदभाव व दहशतीला थारा नाही. इथे उद्योगस्नेही वातावरण आहे. देशात एकता व सहिष्णुता टिकली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. (वृत्तसंस्था)उद्योगस्नेही धोरणे राबविण्याबाबत पश्चिम बंगाल हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे, असे मत रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या परिषदेत व्यक्त केले. बंगाल जागतिक उद्योग परिषदेमध्ये चीन, दक्षिण कोरियासह अनेक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्रात गुंतवणूक क्षमता संपली?, उद्योजकांसाठी आता पश्चिम बंगाल हाच उत्तम पर्याय - ममता बॅनर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 3:13 AM