नवी दिल्ली - केलेली बचत वाढावी यासाठी गुंतवणूकदार म्युच्युअल फंड, एसआयपीचा पर्याय निवडत असतात. मे महिन्यात एसआयपीद्वारे २०,९०४ कोटींची विक्रमी गुंतवणूक करण्यात आली. परंतु त्याचवेळी मे महिन्यात ४३.९६ लाख एसआयपी खाती बंद करण्यात आली आहेत. हे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत ३२.२१ टक्के अधिक आहे. एप्रिलमध्ये ३३.२५ लाख एसआयपी खाती बंद करण्यात आली होती. परिणामी सुरु होणाऱ्या नव्या एसआयपी खात्यांच्या तुलनेत बंद होणाऱ्या एसआयपी खात्यांचे प्रमाण विक्रमी ८८.३८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. गुंतवणूक क्षेत्रातील जाणकारांनी याला धोक्याची घंटा आहे, असे म्हटले आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (एएमएफआय) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीतून असे दिसून आले आहे की, एकट्या मे महिन्यात एसआयपीची ४९.७४ लाख नवी खाती उघडण्यात आली. एप्रिलमध्ये हीच संख्या ६३.६५ लाख इतकी होती.
म्युच्युअल फंडात गंतवणुकीचा विक्रम
केवळ मे महिन्यात म्युच्युअल फंडात लोकांनी ३४,६९७ कोटी गुंतविले आहेत. ही गुंतवणूक मागील महिन्याच्या तुलनेत ८३ टक्के अधिक आहे. एप्रिलमध्ये म्युच्युअल फंडात १८,९१७ रुपये गुंतविण्यात आले होते. त्यामुळे म्युच्युअल फंडातील एकूण व्यवस्थापनाधीन रक्कम (एयूएम) ५८.९१ लाख कोटींवर पोहोचली आहे. एप्रिलमध्ये ही रक्कम ५७.२६ लाख कोटी इतकी होती.
एसआयपी अकाऊंट का घटत आहेत?
- सध्या सुरु असलेल्या केवायसी पडताळणी प्रक्रियेमुळे हे घडले, असावे असे काहींचे म्हणणे आहे. सर्व डीमॅट खातेधारकांना ही प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.
- अनेक गुंतवणूकदार नफा काढून घेतल्यानंतर एसआयपी बंद करत आहेत. अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी निवडणुकांमुळे बाजारात वाढलेल्या अनिश्चिततेमुळे एसआयपीची जाहिरात कमी केली.
-गुंतवणूकदारांचा एक मोठा वर्ग सध्या कमालीची सावध आहे. बाजारातील स्थिरता संपून स्पष्टता यावी याची वाट पाहत आहे. याचाही मागील चार महिन्यात एसआयपी गुंतवणुकीवर परिणाम झाला असण्याची शक्यता आहे.