Join us

तेलंगणात गुंतवणूक, मुख्यमंत्री शिंदेंसोबत 'चाय पे चर्चा'; दावोसमध्ये अदानींचा बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 7:19 PM

ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.  

मुंबई - दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच विविध देशांतील शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा केली. विशेष म्हणजे दावोस दौऱ्यात देशातील नामवंत उद्योगपती आणि जगातील गर्भश्रीमंतांच्या यादीतील गौतम अदानी यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत चाय पे चर्चा केल्याचं पाहायला मिळालं. स्वत: मुख्यमंत्री शिंदेंनी ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रत ४ लाख कोटींची गुंतवणूक होणार असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी तयार आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

दावोस येथील परिषदेच्या पहिल्याच दिवशी संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्यमंत्री अब्दुला बिन टौक आणि लुलू हायपरमार्केटचे कार्यकारी संचालक एम.ए. युसुफ अली यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या दोघांसमवेत झालेल्या चर्चेत महाराष्ट्रात असलेल्या गुंतवणुकीच्या संधी आणि त्या क्षेत्रात दीर्घकालीन संबंध वाढविण्यावर भर देण्यात आला. शिंडलर इलेक्ट्रिकचे आंतरराष्ट्रीय कार्यान्वयन कार्यकारी तथा उपाध्यक्ष मनीष पंत यांच्याशी देखील चर्चा झाली. महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीच्या क्षेत्राबाबत संवाद साधतानाच औद्योगिक संबंध दृढ करण्याबाबत शिष्टमंडळासोबत चर्चा झाली.

भारतातील नामवंत उद्योगपती गौतमी अदानी यांनी दावोस येथील परिषदेत तेलंगणा सरकारसोबत १२,४०० कोटींच्या गुंतवणुकीचा करार केला. त्यानुसार, ४ करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. दुसरीकडे आज गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन चाय पे चर्चा केली. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्र, गुंतवणुकीच्या संधी आदी विषयांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे, दावोस येथील परिषदेतून महाराष्ट्रातही अदानी काही गुंतवणूक करणार आहेत का?, हे पाहावे लागणार आहे. 

तेलंगणात १२,४०० कोटींचीं गुतवणूक

अदानी ग्रुपच्यावतीने दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये तेलंगणा सरकारसोबत ४ महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरीही करण्यात आली. त्यानुसार, अदानी समुहाशी निगडीत कंपन्यांसोबत १२,४०० कोटींचे करार झाले आहेत. तेलंगणात अदानी समुहाकडून १०० एमडब्लू डेटा सेंटर उभारण्यात येणार असून त्यासाठी ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. तसेच, अदानी ग्रीनच्यावतीने दोन पंप स्टोरेज उभारण्यात येत असून त्यासाठीही ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. तर, अदानी डिफेन्स व एअरोस्पेसमध्ये  काऊंटर ड्रोन व मिसाईलच्या प्रकल्पासाठी १००० कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे. यासंदर्भात, दावोस येथील फोरममध्ये गुंतवणुकीच्या करारावर स्वाक्षरी झाल्या आहेत. 

टॅग्स :गौतम अदानीमुख्यमंत्रीएकनाथ शिंदेव्यवसाय