लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. वायदा बाजारासह देशातील सराफा बाजारातही सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. वायदा बाजारात सोन्याचे दर १५ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आले असून, चांदीही पार घसरली आहे. डॉलर भक्कम झाल्याने सोने-चांदीच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात अतिशय नरमल्या आहेत.
जागातिक बाजारात सोने १६८० डॉलर प्रति औंसच्या खालच्या स्तरावर आले असून, चांदीही १८.६२ डॉलरवर आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर कोसळून ४९,७०३ रुपयांवर आला असून, चांदीही १ हजार ४६८ रुपयांनी खाली आली असून, ५४,१५१ रुपये प्रति किलो या स्तरावर प्रथमच आली आहे.
चांदीच्या किमती एका महिन्यात तब्बल १४ टक्क्यांनी कोसळल्या आहेत. जागतिक बाजारात मंदीची स्थिती असून, कंपन्यांकडून मागणी कमी झाल्याचा हा परिणाम असल्याचे बाजारतज्ज्ञांनी सांगितले.
का घसरल्या किमती?
डॉलर भक्कम झाल्याने सोने-चांदीसह इतर साहित्यांच्या किमतीही घसरल्या. व्याजदर वाढण्याची शक्यता असल्याने वस्तूंच्या किमतीवर दबाव. युरोपच्या सेंट्रल बँकेने ११ वर्षांत प्रथमच व्याज दरात ०.५० टक्क्यांनी वाढ केली. मंदीच्या भीतीने मागणी कमी तसेच जागतिक बाजारातही घसरण होत असल्याने सोने-चांदीचे दर घसरले.
पुढे काय हाेईल?
बाजारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारात डॉलर भक्कम झाल्याचा परिणाम सोने-चांदीच्या किमतीवर पुढेही पहायला मिळणार आहे. बाजाराच्या चढउतारानुसार, सध्या गुंतवणूकदार डॉलरमध्ये पैसे गुंतवत आहेत, तर सोने-चांदीमधील गुंतवणूक काढून घेत आहेत. भारत सरकारने सोने आयातीवर शुल्कात वाढ केल्याने त्याच्या विक्रीत प्रचंड मोठी घट झाली आहे. त्यामुळे याचा परिणाम म्हणून सोन्याच्या किमतीत आणखी घसरण पहायला मिळण्याची शक्यता आहे.