Investment Rule of 72 : महिन्याला पगार मिळतो, परंतु काही दिवसांतच खर्च होतो. खर्चाच्या या सततच्या चक्रामुळे अनेकांना तारेवरची कसरत करावी लागते. कोणत्याही आर्थिक समस्येपासून वाचण्यासाठी एक गोष्ट करण्यासाठी कायम सांगितली जाते, ती म्हणजे योग्य ठिकाणी बचत. बचत करुन तुम्ही ठराविक काळात एक मोठी रक्कम उभारू शकता. सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता.
गुंतवणूक करण्यापूर्वी अनेकांचा प्रश्न असतो की, त्यांचे पैसे दुप्पट कधी होणार? तुम्हालाही तुमची गुंतवणुक दुप्पट करायची असेल किंवा केलेली गुंतवणूक दुप्पट कधी होणार, याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. गुंतवणूक कुठेही, कशीही करुन चालत नाही. अतिशय नियोजनबद्ध गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. गुंतवणुकीचा एक नियम आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमचे पैसे दुप्पट कधी होणार, हे जाणून घेऊ शकता.
रुल ऑफ 72 - तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट कधी होणार, हे जाणून घ्यायचे असेल, तर 72 चा नियम तुमची मदत करू शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर जे व्याज मिळते, त्याने 72 ला भाग द्यावा लागेल. येणारे उत्तर म्हणजे तुमचे पैसे दुप्पट होणारे वर्ष असेल. उदाहरण म्हणून समजून घ्यायचे असेल, तर 72 ला 8 ने भागल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळेल 9. जर तुम्हाला गुंतवणूकीवर 8 टक्क्यांचे व्याज मिळत असेल, तर 9 वर्षांमध्ये तुमची रक्कम दुप्पट होईल.
रुल ऑफ 114 -जर तुम्हाला तुमची रक्कम तिप्पट करायची असेल तर तुम्हाला रुल ऑफ 114 मदत करेल. हा फॉर्म्युला रुल ऑफ 72 चाच आहे, परंतु नंबर्स मात्र बदलतील. तुम्ही व्याजाच्या आधारे केव्हा पैसे तिप्पट होतील हे पाहू शकता. जर तुम्ही 8 टक्के दराने गुंतवणूक करत असाल, तर अशात 114 ला 8 ने भागा, त्याचे उत्तर येईल 14.2. याचाच अर्थ 14 वर्षांमध्ये तुमचे पैसे तिप्पट होतील.
गुंतवणुकीसाठी हे सुरक्षित पर्याय आहेत.
1. बँक एफडी: सध्या बँक एफडीवरील व्याजदर वाढले आहे. अनेक बँका 8 टक्क्यांपर्यंत व्याज देतात. या व्याजावर तुमचे पैसे 9 वर्षांत दुप्पट होतील.
2. PPF: PPF मध्ये वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज दिले जाते. यानुसार, तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी 10.14 वर्षे लागतील.
3. सुकन्या समृद्धी योजना: जानेवारीपासून या योजनेतील व्याज 8.2 टक्के झाले आहे. तुम्ही या व्याज दराने 72 ला भागल्यास तुमचे पैसे 8.7 वर्षांत दुप्पट होतील.
4. किसान विकास पत्र: या सरकारी योजनेत 7.5 टक्के व्याज दिले जाते. तुम्ही या व्याजाने 72 ला भागले, तर तुम्हाला 9.6 वर्षात पैसे दुप्पट होतील.
5. NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये सध्या 7.7 टक्के व्याज उपलब्ध आहे. या व्याजदरानुसार तुमचे पैसे 9.3 वर्षांत दुप्पट होतील.
6. NPS: राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये सरासरी 10 ते 11 टक्के व्याज मिळते. जर तुम्ही सरासरी 10.5 टक्के व्याज पाहिले तर तुमचे पैसे 6.8 वर्षांत दुप्पट होतील.
(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)