Join us

‘वेकोलि’ करणार साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक

By admin | Published: October 26, 2015 11:21 PM

डबघाईस आलेल्या ‘वेकोलि’ने (वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड) परत भरारी घेतली आहे. ‘वेकोलि’कडून येत्या पाच वर्षांत साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार

नागपूर : डबघाईस आलेल्या ‘वेकोलि’ने (वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड) परत भरारी घेतली आहे. ‘वेकोलि’कडून येत्या पाच वर्षांत साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कोळसा, ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. ‘वेकोलि’च्या नागपूर मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला सोमवारी गोयल यांनी संबोधित केले. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ‘वेकोलि’चे ‘सीएमडी’ राजीव रंजन मिश्रा हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘वेकोलि’तर्फे २४ महिन्यांत २४ खाणी उघडण्याचा दावा करण्यात आला आहे. गेल्या १० महिन्यांत १० नवीन खाणी उघडण्यात यश आले आहे. २०१९-२० पर्यंत ‘वेकोलि’कडून नवीन खाणी उघडणे तसेच जुन्या खाणींच्या देखभालीसाठी ६ हजार ६०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ‘वेकोलि’ने या वर्षी ४५ मिलियन टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे असे गोयल यांनी सांगितले. देशात सत्ताबदल झाल्यापासून ‘कोल इंडिया’नेदेखील प्रगती केली असून गेल्या वर्षभरात ३२ मिलियन टन कोळशाचे अतिरिक्त उत्पादन झाले. यंदाच्या वर्षी एकूण ५५० मिलियन टन कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट आहे.