मुंबई : देशाच्या दाेन्ही शेअर बाजारांनी विक्रमी झेप घेत ऐतिहासिक उच्चांकी मजल मारली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७६५.०४ अंशांनी, तर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २२५.८५ अंशांनी वधारून उच्चांकी पातळीवर बंद झाले. जागतिक बाजारपेठेतील सकारात्मकतेचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला. या तेजीमुळे गुंतवणूकदार एकाच दिवसात साडे तीन लाख काेटी रुपयांनी मालामाल झाले आहेत.
सेन्सेक्स ५६,८८९.७६ आणि निफ्टी १६,९३१.०५ या उच्चांकी पातळीवर बंद झाले. दिवसभरातील इंट्रा डे व्यवहारांदरम्यान सेन्सेक्सने ५६,९५८.२७, तर निफ्टीने १६,९५१.५० या उच्चांकी पातळीपर्यंत मजल मारली हाेती. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बॅंक आणि ॲक्सिस बॅंक या कंपन्यांच्या शेअर्समध्ये माेठी वाढ दिसून आली.
वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांसह धातू कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. मिडकॅप आणि स्माॅलकॅप शेअर्समध्ये माेठ्या प्रमाणावर खरेदी झाली. एकूणच जागतिक बाजारपेठेत सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे शेअर बाजारांमध्ये तेजी आहे. वित्तीय क्षेत्रापाठाेपाठ धातू क्षेत्रातील कंपन्यांमध्ये चांगली तेजी हाेती. आशिया आणि युराेपमधील सर्वच शेअरबाजारांमध्ये तेजी दिसून आली.
विक्रमी भांडवली मूल्य
एकाच दिवसात गुंतवणूकदार ३.५६ लाख काेटींनी मालमाल झाले आहेत. सेन्सेक्समधील नाेंदणीकृत कंपन्यांचे बाजारपेठेतील एकूण भांडवली मूल्य विक्रमी २४७.३० लाख काेटी रुपयांपर्यंत पाेहाेचले.