पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. बुधवारी बीएसईवर जम्मू-काश्मीर बँकेचा शेअर ९ टक्क्यांनी घसरून १०२.५० रुपयांवर पोहोचला. बँकेच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव आहे. बुधवारी झालेल्या या घसरणीमुळे जम्मू-काश्मीर बँकेच्या शेअर्समधील पाच दिवसांची तेजी संपुष्टात आली आहे. यावर्षी ११ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान जम्मू-काश्मीर बँकेच्या शेअरमध्ये २४.२२ टक्के वाढ झाली होती.
११,५०० कोटींच्या खाली आलं मार्केट कॅप
'पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. या भागातील परिस्थिती येत्या काही दिवसांत शेअरची धारणा निश्चित करेल. परिस्थिती बिघडली नाही तर बँकेच्या शेअर्समध्ये काही सुधारणा दिसू शकते, अशी प्रतिक्रिया शेअर बाजारातील दिग्गज दीपक जसानी यांनी दिली. बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर बँकेचे मार्केट कॅप ११,४५४ कोटी रुपयांवर आलंय. मार्च २०२५ तिमाहीत जम्मू-काश्मीर बँकेचा एकूण व्यवसाय वार्षिक आधारावर १०.६१ टक्क्यांनी वाढून २,५२,७७९.१४ कोटी रुपये झाला आहे. बँकेच्या एकूण ठेवींमध्ये १०.२४ टक्क्यांनी वाढ झाली.
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
५ वर्षांत मोठी तेजी
गेल्या पाच वर्षांत जम्मू-काश्मीर बँकेचा शेअर ५८० टक्क्यांनी वधारला आहे. २४ एप्रिल २०२० रोजी बँकेचा शेअर १५.३३ रुपयांवर होता. २३ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीर बँकेचा शेअर १०२.५० रुपयांवर पोहोचला. गेल्या तीन वर्षांत जम्मू-काश्मीर बँकेच्या शेअरमध्ये २२५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. जम्मू-काश्मीर बँकेच्या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर १४७ रुपये आहे. तर, बँकेच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ८२.०१ रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)