Amitabh Bachchan Bet On Swiggy: नव्या कंपन्या, विशेष करून क्विक कॉमर्स कंपन्या गुंतवणूकदारांची पहिली पसंती बनत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगीमध्ये (Swiggy) हिस्सा खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांच्या फॅमिली ऑफिसनं स्विगीमधील कर्मचारी आणि सुरुवातीच्या गुंतवणूकदारांचे शेअर्स खरेदी करून स्विगीमध्ये एक छोटासा हिस्सा खरेदी केला आहे.
सविस्तर माहिती काय?
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन यांच्याव्यतिरिक्त मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे चेअरमन रामदेव अग्रवाल यांनीही स्विगीमध्ये हिस्सा खरेदी केला आहे. आजकाल क्विक-कॉमर्स फर्म फंड उभारणीच्या बाबतीत उच्चांकी पातळीवर आहे. विशेष म्हणजे अग्रवाल यांनी महिनाभरापूर्वीच ६६५ मिलियन डॉलर्सच्या फंडिंग राऊंडच्या माध्यमातून क्विक कॉमर्स कंपनी झेप्टोमधील (Zepto) हिस्सा खरेदी केला होता.
काय आहेत डिटेल्स?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १० ते ११ बिलियन डॉलर्सच्या मूल्यांकनावर सेकंडरी शेअर्सची विक्री करण्यात आली. इन्स्टामार्ट क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म चालविणाऱ्या स्विगी आणि झेप्टो या दोन्ही कंपन्यांमध्ये अग्रवाल यांनी केलेली गुंतवणूक क्विक कॉमर्सची वेगवान वाढ आणि गुंतवणूकदार या क्षेत्रातील संभाव्य भविष्यातील बाजारपेठेकडे लक्ष देत असल्याचंही अधोरेखित करते.
स्विगीनं आपल्या प्लॅटफॉर्मवर यूपीआय सुरू करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी यूपीआय प्लग इन इंटिग्रेट केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. यामुळे ग्राहकांना स्विगी अॅपमधून बाहेर न पडता यूपीआय ट्रान्झॅक्शन पूर्ण करता येणार आहे.