प्रसाद गो. जोशी
परकीय वित्तसंस्थांकडून खरेदी होत असल्याने शेअर बाजार वाढला असला तरी आगामी सप्ताहामध्ये वाढीची वाट खडतर दिसत आहे. अमेरिका आणि युरोपमधील व्याजदरांची होणारी घोषणा तसेच देशांतर्गत आकडेवारी आणि कंपन्यांचे निकाल यावर बाजाराची वाटचाल ठरणार आहे. मात्र मंदीच्या भीतीची पार्श्वभूमी असताना ही वाट अवघड भासत आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारामध्ये वाढ झाल्यामुळे बाजारातील एकूण नोंदणीकृत कंपन्यांच्या एकत्रित भांडवलमूल्यामध्ये वाढ झाली आहे. या सप्ताहामध्ये हे भांडवलमूल्य सहा लाख ८५ हजार ८२७.८७ कोटी रुपयांनी वाढून २,७१,८२,८५८.९२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
आधीच्या सप्ताहातील घसरण भरून निघाली आहे. मात्र, या आठवड्यात तेजीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. या सप्ताहात अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत निर्णय जाहीर करणार आहे. त्यापाठोपाठ युरोपियन बँकेचे व्याजदर जाहीर होतील. जगभरातील मंदीची भीती बघता, व्याजदर वाढण्याची शक्यता दिसते. तसे झाल्यास बाजार नकारात्मक प्रतिक्रिया देऊ शकतो. याबरोबरच या सप्ताहात देशातील वाहन विक्री, पीएमआयची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच कंपन्यांचे तिमाही निकालही जाहीर होतील. या सर्व घटकांचा परिणाम बाजारावर होणार आहे. त्यामुळेच बाजार काहीसा नकारात्मक राहण्याची शक्यता आहे.
सेन्सेक्स गेल्या आठवड्यात १४५७.३८ अंशांनी वाढून ६१ हजारांचा टप्पा पार करून गेला. सप्ताहाच्या अखेरीस तो ६१,११२.४४ अंशांवर स्थिरावला. निफ्टीमध्येही वाढ झाली आहे. हा निर्देशांक २४०.९५ अंशांनी वर जाऊन १८ हजारांवर गेला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही चांगली वाढ झाल्याचे बघावयास मिळाले. या सप्ताहामध्ये व्यवहाराचे दिवस थोडेच असतील.
परकीय वित्तसंस्थांची मोठी गुंतवणूक
एप्रिल महिन्यामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये परकीय वित्तसंस्थांनी मोठी गुंतवणूक केल्याचे दिसून येते. याचाच अर्थ भारताच्या विकास दराबाबत या संस्था आशावादी आहेत. एप्रिल महिन्यामध्ये या संस्थांनी भारतीय शेअर बाजारामध्ये ११,६३० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याआधीच्या महिन्यात (मार्च) या संस्थांनी खरेदीच केली आहे.