Join us

‘फ्रँकलिन टेम्पलटन’चे गुंतवणूकदार हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 3:03 AM

म्युच्युअल फंड कंपनी फ्रँकलिन टेम्पलटनने भारतात सुरू असलेल्या सहा म्युच्युअल फंड योजना शुक्रवारी अचानक बंद केल्याने गुंतवणूकदार विशेषत: ज्येष्ठ नागरिक व निवृत्तिवेतनधारक हादरले आहेत.

सोपान पांढरीपांडे नागपूर : जगप्रसिद्ध म्युच्युअल फंड कंपनी फ्रँकलिन टेम्पलटनने भारतात सुरू असलेल्या सहा म्युच्युअल फंड योजना शुक्रवारी अचानक बंद केल्याने गुंतवणूकदार विशेषत: ज्येष्ठ नागरिक व निवृत्तिवेतनधारक हादरले आहेत. कंपनीच्या या सहा योजनांमध्ये गुंतवणुकदारांचे तब्बल ३१ हजार कोटी अडकले असून, ही रक्कम केव्हा मिळेल याची कुणालाच शाश्वती नाही. फ्रँकलिन टेम्पलटनने मात्र आमचे पैसे गैर-बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) व सूक्ष्म वित्त पुरवठा संस्थांकडे (एमएफआय) थकीत झाले असून, त्याची वसुली होताच गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची घोषणा केली आहे. तसेच असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंड्स इन इंडियानेसुद्धा (अ‍ॅम्फी) हे तात्पुरते संकट असून फ्रँकलिन टेम्पलटन पैसे परत करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.फ्रँकलिन टेम्पलटन ही अमेरिकेतील वित्तीय सेवा कंपनी असून, जगभर तब्बल ७०० अब्ज डॉलर (५२.५० लाख कोटी रुपये) एवढ्या प्रचंड गुंतवणुकीचे व्यवस्थापन करते. भारतात फ्रँकलिन टेम्पलटन १.१६ लाख कोटींची गुंतवणूक विविध म्युच्युअल फंडामार्फत हाताळते. जगप्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ मार्क मीबियस यांनी नावारूपाला आणलेल्या या कंपनीवर ही वेळ येणे लांच्छनास्पद आहे.फ्रँकलिन टेम्पलटनच्या या सहा योजनांमध्ये गुंतवणूकदारांचे ३१ हजार कोटी आहेत. त्यापैकी कंपनीने चक्क १८ हजार कोटी गैर-बँकिंग वित्तीय संस्थांमध्ये (एनबीएफसी) गुंतविले आहेत. याशिवाय ५,८०० कोटी वीजनिर्मिती कंपन्या व ४,२०० कोटी स्थावर मालमत्ता व गृहकर्ज कंपन्यांना कर्जाऊ दिले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या