Ashapuri Gold Ornament Ltd Share Price : शेअर बाजारावर बुधवारी व्यवहारादरम्यान विक्रीचा दबाव कायम राहिला आणि निफ्टी २३८०० च्या सपोर्ट लेव्हलच्या जवळ आला. बाजारात सेलर्सचं वर्चस्व आहे आणि एफआयआयनंदेखील बऱ्याच काळापासून केवळ विक्री केली आहे. बाजारात विक्री सुरू राहिली तर निफ्टीमध्येही २३,५०० ची पातळी दिसू शकते, असं जाणकारांचं मत आहे.
दरम्यान, बाजारात शेअर स्पेसिफिक अॅक्शन पाहायला मिळत आहे. काही गुंतवणूकदारांची नजर मजबूत फंडामेंटल असलेल्या पेनी शेअर्सकडेही आहे. ज्वेलरी सेगमेंटमधील एक पेनी स्टॉक गुंतवणूकदारांच्या रडारवर असून सलग दोन दिवसांपासून त्यात अपर सर्किटवर लागत आहे. हा शेअर म्हणजे Ashapuri Gold Ornament Ltd.
Ashapuri Gold Ornament Ltd ही एक ज्वेलरी निर्माता आणि सप्लायर कंपनी आहे. ती वेगवेगळ्या डिझाइनच्या सोन्याच्या दागिन्यांचा व्यवसाय करते. Ashapuri Gold Ornament Ltd नं नुकताच टायटन कंपनीसोबत करार केला असून, त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून कंपनीच्या शेअरच्या किमतीत अपर सर्किट लागत आहे. बुधवारी कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांनी वधारून ९.०४ रुपयांवर आले. कंपनीचं मार्केट शेअर ३०१.३२ कोटी रुपये आहे.
टायटनसोबत करार
आशापुरी गोल्ड ज्वेलरी लिमिटेडने सोन्याच्या दागिन्यांच्या सप्लायसाठी टायटन कंपनी लिमिटेडसोबत करार केला आहे. हा करार १ ऑगस्ट २०२४ पासून लागू होऊन ३१ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आला असून, करार कालावधीत टायटननं घेतलेल्या विशिष्ट खरेदी आदेशानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या पुरवठ्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.
या करारामध्ये टायटन कंपनी लिमिटेड या देशांतर्गत युनिटचा समावेश असून सोन्याच्या दागिन्यांच्या उत्पादनांच्या पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. करारामध्ये निश्चित आर्थिक मूल्य नमूद करण्यात आलेलं नाही.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)