Adani Green Energy Ltd share: अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स आज बुधवारी फोकसमध्ये आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये आज 15 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. यासह अदानी ग्रीनचे शेअर्स 1991.60 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. अदानी ग्रीन एनर्जीचं मार्केट कॅप 2,96,911.05 कोटी रुपये झालं. शेअर्सच्या या वाढीमागे एक चांगली बातमी आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड अमेरिकन फर्मसह परदेशी बँकांच्या समूहाशी निधी उभारण्यावर चर्चा करत आहे.
डिसेंबर तिमाहीचे निकाल
चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) अदानी ग्रीन एनर्जीचं एकात्मिक निव्वळ नफा 148 टक्क्यांहून अधिक वाढून 256 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 च्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 103 कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्न वाढून 2,675 कोटी रुपये झालं, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 2,256 कोटी रुपये होतं, अशी माहिती कंपनीनं दिली. अदानी ग्रीन एनर्जी ही देशातील सर्वात मोठी आणि जगातील आघाडीची रिन्युएबल एनर्जी सोल्युशन प्रोव्हायडर कंपनी आहे.
कंपनी गुजरातमधील खवरा येथे जगातील सर्वात मोठा रिन्युएबल एनर्जी प्रकल्प उभारण्याचं काम करत आहे. कंपनीची ऑपरेटिंग क्षमता वर्षभरात 16 टक्क्यांनी वाढून 8,478 मेगावॅट झाली. एप्रिल-डिसेंबर 2023 या कालावधीत, वीज विक्री वार्षिक 59 टक्क्यांनी वाढून 16,29.3 युनिट झाली. अलीकडेच अदानी ग्रीननं आपल्या 75 कोटी डॉलर्सचे बॉन्ड मॅच्युअर होण्याच्या आठ महिन्यांपूर्वी फंड जमा केला आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)